मोहन जोशी आणि वंदना गुप्ते यांना जीवनगौरव पुरस्कार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2023 08:34 AM2023-06-11T08:34:20+5:302023-06-11T08:36:00+5:30

यशवंत नाट्य मंदिर रसिकांनी पुन्हा गजबजणार; १४ जूनला सुरू होणार

lifetime achievement award to mohan joshi and vandana gupte | मोहन जोशी आणि वंदना गुप्ते यांना जीवनगौरव पुरस्कार

मोहन जोशी आणि वंदना गुप्ते यांना जीवनगौरव पुरस्कार

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : माटुंगा येथील यशवंत नाट्य मंदिर १४ जूनला गोविंद बल्लाळ देवल स्मृतिदिनाच्या मुहूर्तावर पुन्हा सुरू होणार आहे. यानिमित्त आयोजित केलेल्या सोहळ्यात ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी आणि अभिनेत्री वंदना गुप्ते यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. १ जुलैपासून नाट्यगृह पुन्हा रसिकांच्या सेवेत रुजू होणार असल्याची माहिती नाट्य परिषदेच्या पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आली. 

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीत बाजी मारल्यानंतर अध्यक्ष प्रशांत दामले, प्रमुख कार्यवाह अजित भुरे आणि कोषाध्यक्ष सतीश लोटके यांच्या उपस्थितीत दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक येथे पत्रकार परिषद घेण्यात आली. नवीन कार्यकारिणीने अल्पावधीत यशवंत नाट्य मंदिरात आवश्यक बदल व नूतनीकरण केल्याचे सांगण्यात आले. नाट्य परिषदेतर्फे दरवर्षी १४ जूनला गो. ब. देवल स्मृतिदिन व पारितोषिक वितरण सोहळ्याचे आयोजन केले जाते; परंतु मागील चार वर्षांमध्ये नाट्य मंदिरात कोणताही कार्यक्रम झाला नाही. यंदा गो. ब. देवल स्मृतिदिन सोहळ्यामध्ये नाट्य परिषदेचे माजी अध्यक्ष व ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी आणि अभिनेत्री वंदना गुप्ते यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. सन्मानचिन्ह, पुष्पगुच्छ, शाल, श्रीफळ व ५१ हजार रुपये असे पुरस्काराचे स्वरूप असेल. या सोहळ्यात पद्मश्री डॉ. परशूराम खुणे यांचा  सत्कारही करण्यात येणार आहे.

नाट्य मंदिर पूर्वीप्रमाणे नाटक, संगीत कार्यक्रम, सभा व सांस्कृतिक उपक्रमांसाठी १ जुलैपासून सुरू होणार असल्याचे भुरे यांनी सांगितले. नाट्य संकुलात नाट्यगृह, नाटकाच्या तालमीसाठी अद्ययावत तालीम हॉल, छोट्या कार्यक्रमांसाठी मंच, लायब्ररी, नाट्य कला अकादमी, कलावंतांसाठी निवास व्यवस्था व नाट्यअनुषंगिक सर्व घटकांसाठी नाट्य परिषद पुढील काळात काम करणार आहे. १००व्या नाट्य संमेलनाबाबत लवकरच निर्णय घेण्यात येणार असल्याचेही दामले यांनी सांगितले.


 

Web Title: lifetime achievement award to mohan joshi and vandana gupte

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.