Join us  

गाडीवर लिफ्ट कोसळल्याने दोन ठार

By admin | Published: April 21, 2016 4:47 AM

टॉवरमध्ये गाडी पार्किंग करीत असताना लिफ्ट पडून झालेल्या अपघातात शाळकरी मुलासह दोघेजण जागीच ठार होण्याची घटना बुधवारी मुंबई सेंट्रल येथील मराठा मंदिर टॉकीजच्या परिसरात घडली

मुंबई: टॉवरमध्ये गाडी पार्किंग करीत असताना लिफ्ट पडून झालेल्या अपघातात शाळकरी मुलासह दोघेजण जागीच ठार होण्याची घटना बुधवारी मुंबई सेंट्रल येथील मराठा मंदिर टॉकीजच्या परिसरात घडली. मोटारीची धडक इतकी भीषण होती की ती लिफ्टमध्ये घुसून दोन मजले खाली कोसळली. या भीषण अपघातामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. रात्री उशिरापर्यंत गाडी काढण्याचे काम सुरु होते. अपघातात हाफीज अयूब पटेल (१४) व कारचालक जावेद अहमद शेख (२६) अशी मृताची नावे आहेत. या विचित्र अपघातामुळे परिसरात काहीकाळ गोंधळ उडाला होता. नागपाड्यातील मदनपुरा येथील वायएमसी मैदानाच्या बाजूला इकबाल हाईट्स नावाची २२ मजली इमारत असून तळमजला आणि पहिल्या दोन मजल्यावर कार पार्किंग आहे. याठिकाणी राहात असलेल्या अयुब शेख यांचा मुलगा हाफिज व त्यांचा चालक जावेद शेख हा इटोस गाडी दुसऱ्या मजल्यावरील पार्किंगमध्ये लावण्यासाठी जात होते. त्यावेळेस वळण घेत असताना चालकाचे गाडीवर नियंत्रण न राहिल्याने ती लिफ्टच्या दरवाज्याला धडकली. वेगामुळे दरवाजा उघडल्याने गाडी लिफ्टच्या मोकळ््या जागेमध्ये शिरली. याचा धक्का बसून वरच्या मजल्यावरील लिफ्ट त्यावर जोरात येऊन आदळली. त्यामुळे गाडीसह लिफ्ट खाली गेली. त्यात अडकेल्या दोघांना बाहेर पडणे शक्य झाले नाही. त्यांचे डोके व अन्य भागाला गंभीर दुखापत झाल्याचे जागीच मृत्यू झाला. या धडकेच्या आवाजामुळे फ्लॅटधारक व परिसरातील नागरिकांनी त्याठिकाणी धाव घेतली. त्यांनी मोटारीतून दोघांना बाहेर काढत खासगी रुग्णालयात नेले असता मृत घोषित करण्यात आले. लिफ्टखालून मोटार काढण्याचे काम रात्री उशिरापर्यत सुरु होते. (प्रतिनिधी)