Join us

पहिल्यांदाच पादचारी पुलाला लिफ्टची सोय;कांदिवलीत पालिका उभारणार पादचारी पूल

By सीमा महांगडे | Updated: January 12, 2024 18:17 IST

६ कोटींचा खर्च 

मुंबई: कांदिवली पश्चिमेकडील लालजी पाडा येथे पालिकेतर्फे पादचारी पूल बांधला जाणार असून या पुलाला जिने, सरकते जिने आणि प्रथमच उद्वाहनाची सोयही असणार आहे. या पुलासाठी ६ कोटी रुपये खर्च येणार आहे. हा पूल झाल्यास लालजी पाडा, गणेश नगर, इंदिरा नगर, संजय नगर, जनता कॉलनी, अभिषेक नगर येथील रहिवाशांना फायदा होणार आहे.

कांदिवली पश्चिमेकडील लालजी पाडा येथे पालिकेतर्फे एक पादचारी पूल तयार करण्यात येणार आहे. या पुलाला सरकत्या जिन्यांबरोबरच उदवाहनाची सोयही देण्यात येणार आहे. त्याकरीता कंत्राटदाराची नेमणूक करण्यात आली आहे. मुंबईतील हा या प्रकारचा पहिलाच पूल असेल. यापूर्वी मुंबईत किंग्ज सर्कल येथे पालिकेने पहिला सरकता जिना असलेला पूल तयार केला होता. त्यानंतर आता बहुतांशी पादचारी पुलांना सरकते जिने बसवण्यात येणार आहे. मात्र उदवाहनाची सोय असलेला हा पहिला पूल कांदिवलीत तयार होणार आहे. 

या पुलासाठी पालिकेने न्यू लिंक रोड आणि वाडीलाल गोसालिया रोड या परिसराचे सर्वेक्षण केले होते. त्यावेळी या रस्त्याचा रोज किती पादचारी वापर करताता त्याचा आढावा घेण्यात आला होता. त्यात या मार्गाने सरासरी किमान २७ हजार पादचारी रस्ता ओलांडून जात असल्याचे आढळून आले होते. त्यामुळे या पुलाची आवश्यकता असल्याचे मत भाजपचे माजी नगरसेवक कमलेश यादव यांनी व्यक्त केले आहे. यादव यांनी या पुलाची मागणी गेल्यावर्षी केली होती. त्यानुसार आता हा पूल बांधण्यात येणार आहे.

पाच वर्षांची जबाबदारी या पुलाच्या व उदवाहनाच्या देखभालीची पाच वर्षांची जबाबदारी देण्यात आली आहे. पूल बांधणे आणि देखभाल या कामासाठी ५ कोटी ६९ लाख रुपये खर्च होणार आहे. पुढील दोन वर्षांत हा पूल बांधून तयार होणार आहे.

टॅग्स :मुंबई महानगरपालिका