मुंबई : येत्या रेल्वे अर्थसंकल्पात मुंबईकरांना बरीच आशा आहे. यंदा पश्चिम रेल्वेने स्थानकांवरील काही सोईसुविधांसाठी रेल्वे बॉर्डाकडे निधी मागितला आहे. त्याबाबतचा प्रस्ताव पाठविण्यात आला असून, रेल्वे अर्थसंकल्पात हा निधी मिळेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे. २५ फेब्रुवारी रोजी रेल्वे अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. या अर्थसंकल्पाकडे अनेकांचे डोळे लागले असून, विशेषत: मुंबईकरांनी मोठी आशा बाळगली आहे. मोठ्या घोषणा झाल्या तर ठीक, नाहीतर स्थानकांवरील सोईसुविधा पूर्ण करण्यावर तरी भर देण्यात यावा, अशी मागणी केली जात आहे, त्याचा विचार करता पश्चिम रेल्वेने स्थानकांवरील सोईसुविधा पूर्ण करण्यासाठी लागणाऱ्या निधीचा एक प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे पाठविला आहे. सध्या पश्चिम रेल्वे मार्गावर विरारपर्यंत आणखी ५0 सरकते जिने बसविण्यात येणार आहेत, तर दहा लिफ्टही बसविल्या जाणार असून, त्याला चांगलाच निधी लागेल, तसेच काही स्थानकांवर डिलक्स टॉयलेटही उभारले जाणार आहेत. यासाठी निधी लागणार असल्याची माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी रवींद्र भास्कर यांनी दिली. महत्त्वाची बाब म्हणजे, रेल्वे रुळांजवळ नवीन संरक्षक भिंतीही बांधण्यात येणार आहेत. त्यासाठीही निधी आवश्यक असून, तसा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. त्याला रेल्वे अर्थसंकल्पात मंजुरी मिळेल, अशी आशा आहे. (प्रतिनिधी)
लिफ्ट,सरकत्या जिन्यांसाठी निधीची गरज
By admin | Published: February 19, 2016 2:45 AM