मुंबई : आज देशभरात छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे मावळे यांच्या पराक्रमामुळे दिवाळी साजरी होते. महाराज आणि मावळे यांच्या शौर्याला मानवंदना देण्यासाठी शिवभक्तांनी तब्बल ३४५ मशाली प्रज्वलित करून हिंदवी स्वराज्याची राजधानी ‘किल्ले रायगड’ उजाळला. ‘पहिला दिवा महाराजांच्या चरणी त्यानंतर आपल्या घरी’ या निर्धाराने शिवभक्तांनी दिवाळीची पहिली पणती राजदरबारामध्ये प्रज्वलित करून रविवारी शिवचैतन्य सोहळा साजरा केला.दरवर्षी ऐन दिवाळीत किल्ले रायगड अंधारात राहतो. यासाठी श्री शिवराज्याभिषेक दिनोत्सव समिती, दुर्गराज रायगड या संस्थेच्या वतीने सलग सहाव्या वर्षी किल्ले रायगड मशालींच्या प्रकाशात उजाळण्यात आला. या देदीप्यमान सोहळ्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपºयातून मोठ्या संख्येने शिवभक्त उपस्थित झाले होते.पारंपरिक वेशभूषेमध्ये उपस्थित असलेल्या शिवभक्तांमध्ये तरुणांचा वर्ग मोठ्या प्रमाणात होता. मशालींच्या उजेडात सर्वप्रथम गडदेवता शिर्काई देवीची पूजा झाल्यानंतर महाराजांची पालखी मिरवणूक काढण्यात आली. या वेळी ‘एक व्यक्ती, एक मशाल’ याप्रमाणे ३४५ मशाली प्रज्वलित करून महाराजांना मानवंदना देण्यात आली.याआधी राजसदर, शिर्काई मंदिर, जगदिश्वर मंदिर, महाराजांची समाधीस्थळ, वाडेश्वर मंदिर, बाजारपेठ, भवानी कडा यांसारख्या प्रमुख स्थळांवर साफसफाई करून रांगोळ्यांसह फुलांची सजावट करण्यात आली.तसेच, शिवचैतन्य सोहळा पार पडल्यानंतर दुसºया दिवशी सकाळी गडावर फराळ वाटप करण्यात आले. शिवाय, कांदिवली येथील युवा मंचच्या सहकार्याने समितीने गडावरील शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक वस्तूंची मदत करण्यात आली.गाजले ‘आम्ही मावळे’शिवचैतन्य सोहळा बोरीवली येथील ‘आम्ही मावळे’ ढोलताशा पथकाने अप्रतिम वादन करून गाजवला. ढोलताशांच्या गजरात पालखी मिरवणूक राजसदरेजवळ येताच नगारखानामध्ये आम्ही मावळे पथकाने आपल्या वादनाने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.आमची राज्य सरकारकडे विनंती आहे की, आज शिवरायांच्या नावाने राज्यकारभार होतो. राज्यातील प्रमुख किल्ले दिवाळीत अंधारात असतात. त्यामुळे सरकारने हा दीपोत्सव सरकारी इतमामात करावा, अशी आमची इच्छा आहे. महाराज त्यांचे कोणीच नाहीत का? आमचे कार्य त्यांच्यापर्यंत नक्कीच पोहोचते, पण सरकारनेही पुढाकार घ्यायला पाहिजे.- सुनील पवार, अध्यक्ष - श्री शिवराज्याभिषेक दिनोत्सव समिती
मशालींच्या प्रकाशात उजळला किल्ले रायगड, पहिला दिवा महाराजांच्या चरणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2017 7:33 AM