चक्रीवादळाचा परिणाम; गोवा, कोकण, मध्य महाराष्ट्रावर जाणवणार प्रभाव
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्राचे रुपांतर चक्रीवादळात होणार असून, याचा फटका गोव्यासह कोकण आणि मध्य महाराष्ट्राला बसणार आहे. चक्रीवादळाच्या काळात महाराष्ट्राचा समुद्र खवळलेला राहील. ताशी ६० किमी वेगाने वारे वाहतील. महत्त्वाचे म्हणजे चक्रीवादळाचा परिणाम म्हणून मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये हलका पाऊस पडेल, अशी शक्यता भारतीय हवामान शास्त्र विभागाने वर्तविली आहे.
मुंबई प्रादेशिक हवामान शास्त्र विभागाच्या शास्त्रज्ञ शुभांगी भुते यांनी दिलेल्या माहितीनुसार, १४ मे रोजी अरबी समुदात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होत आहे. त्याचे रुपांतर १६ मे रोजी चक्रीवादळात होईल. याचा प्रभाव महाराष्ट्र आणि गोव्याच्या किनारपट्टीवर जाणवेल. महाराष्ट्र आणि गोव्याच्या किनारी वादळी वारे वाहतील. मुसळधार पाऊस पडेल. मध्य महाराष्ट्राच्या काही भागातही याचा प्रभाव जाणवेल. या काळात अरबी समुद्र खवळलेला राहील. वारे ताशी ४० ते ५० किमी वेगाने वाहतील. हा वेग ताशी ६० किमीही असू शकेल. त्यामुळे मच्छीमारांनी समुद्रात उतरू नये, असे आवाहन हवामान खात्याने केले आहे.
* तुरळक ठिकाणी जाेर‘धार’
- १६ मे रोजी पालघर, ठाणे, मुंबईत हलक्या सरी कोसळतील. रायगड जिल्ह्यात मात्र तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल.
- १४, १५ आणि १६ मे रोजी रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडेल. अहमदनगर, पुणे, कोल्हापूर जिल्ह्यातही पाऊस पडेल. सातारा, सांगली, सोलापूर, बीड, नांदेड, लातूर, उस्मानाबाद आणि औरंगाबादमध्येही अशीच अवस्था असेल.
------------------------