मराठी रंगभूमीवर सामाजिक बांधिलकीचा प्रकाशझोत...! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2020 07:18 AM2020-11-05T07:18:21+5:302020-11-05T07:18:37+5:30

मराठी रंगभूमीवर कार्यरत असलेले प्रकाशयोजनाकार श्याम चव्हाण यांनी देहदानाचा निर्णय घेत, दोनच दिवसांपूर्वी त्यासाठी आवश्यक ती प्रक्रिया पूर्ण करत समाजापुढे प्रकाशमय आदर्श ठेवला आहे.

The light of social commitment on Marathi theater ...! | मराठी रंगभूमीवर सामाजिक बांधिलकीचा प्रकाशझोत...! 

मराठी रंगभूमीवर सामाजिक बांधिलकीचा प्रकाशझोत...! 

Next

- राज चिंचणकर 

मुंबई : मार्च महिन्यापासून कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सुरु झालेल्या लॉकडाऊनमुळे नाट्यगृहांवर पडदा पडला आणि नाट्यसृष्टी अंधारात बुडाली. मात्र आता नाट्यगृहे पुन्हा सुरु होण्याच्या मार्गावर असतानाच, सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण ठरावे असा प्रकाशझोत रंगभूमीवर पडला आहे.  
मराठी रंगभूमीवर कार्यरत असलेले प्रकाशयोजनाकार श्याम चव्हाण यांनी देहदानाचा निर्णय घेत, दोनच दिवसांपूर्वी त्यासाठी आवश्यक ती प्रक्रिया पूर्ण करत समाजापुढे प्रकाशमय आदर्श ठेवला आहे. विशेष म्हणजे, मराठी रंगभूमी दिनाच्या पार्श्वभूमीवर सदर घटना घडल्याने, नाट्यसृष्टीच्या दृष्टीने यंदाच्या मराठी रंगभूमी दिनाला अनोखे रंग भरले गेले आहेत. 
श्याम चव्हाण यांचे मराठी नाट्यसृष्टीत मोठे योगदान आहे. राज्य नाट्य स्पर्धा; तसेच अनेक प्रायोगिक आणि व्यावसायिक नाटकांसाठी केलेल्या प्रकाशयोजनेसाठी त्यांना विविध पुरस्कारही प्राप्त झाले आहेत. एकीकडे हे सर्व सुरु असतानाच, संवेदनशील वृत्तीच्या श्याम चव्हाण यांनी काही वर्षांपासूनच अवयवदानाची इच्छा मनात बाळगली होती. मात्र त्याबाबत निर्णय घेऊन तशी नोंदणी करायचे त्यांचे राहून जात होते. मात्र अलीकडेच त्यांनी याबाबत डॉक्टरांकडून आवश्यक ती माहिती घेतली आणि दोन दिवसांपूर्वी रुग्णालयात जाऊन देहदानाची नोंदणी केली. श्याम चव्हाण हे आतापर्यंत सातत्याने रक्तदानही करत आले आहेत. एवढेच नव्हे; तर कर्करोगाच्या रुग्णांसाठी त्यांनी काही महिन्यांपूर्वी प्लेटलेट्स सुद्धा दान केल्या आहेत. अशा सामाजिक कार्यासाठी ते स्वतः तर पुढाकार घेतातच आणि त्याचबरोबर त्यांच्या सहकलाकारांनाही ते यासाठी प्रवृत्त करत असतात, हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा आश्वासक पैलू आहे. 

नाटकामुळे मिळाली प्रेरणा
नाटकांतून विविध घटनांच्या अनुषंगाने, समाजासाठी काय केले पाहिजे याबद्दलचे विषय मांडले जातात. पण कलाकार म्हणून आपण स्वतः त्यासाठी काहीतरी केले पाहिजे असे सतत वाटायचे. त्यातच गेल्या वर्षी राज्य नाट्य स्पर्धेसाठी आमच्या 'विघ्नहर्ता प्रतिष्ठान' या संस्थेतर्फे सत्यघटनेवर आधारित 'मोक्षदाह' हे नाटक आम्ही सादर केले होते. या नाटकात अवयवदान, देहदान असा विषय मांडला आहे. यातूनच प्रेरणा घेत मी देहदान करण्याचा निर्णय घेतला. 
- श्याम चव्हाण, प्रकाशयोजनाकार

Web Title: The light of social commitment on Marathi theater ...!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई