मुंबई : पावसाळ्यात वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार घडतात. तर, काही वेळा जोरदार पावसामुळे उपकेंद्रात किंवा अन्य विद्युत यंत्रणेच्या भोवती पाणी साचते. अशा वेळी वीजपुरवठा बंद करावा लागतो. मात्र, ग्राहकांची गैरसोय होऊ नये. त्यांचा खंडित झालेला वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू असते. तरीही, याबद्दल माहिती देण्याकरिता ग्राहकांनी महावितरणच्या डीएसएस मोबाइल क्रमांकावर वीजपुरवठा खंडित झाल्याबद्दलची तक्रार नोंदवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
वीजपुरवठा खंडित झाल्यावर कुठे संपर्क करावा, असा प्रश्न वीजग्राहकांना पडतो. यासाठी महावितरणतर्फे प्रत्येक मंडळांतर्गत एक डीएसएस कंट्रोल रूम पूर्वीपासून स्थापित करण्यात आली आहे. परंतु, ग्राहकांना डीएसएस कंट्रोल रूमबद्दल माहिती नाही किंवा त्यांना त्यांच्या डीएसएस कंट्रोल रूमचे मोबाइल क्रमांक माहीत नसल्यामुळे अनेकदा गैरसोय होते. ग्राहकांनी आपल्या मंडळातील डीएसएस कंट्रोल रूमला फोन करून वीजपुरवठा खंडित झाल्याबद्दल माहिती द्यावी. त्यानंतर डीएसएस कंट्रोल रूममधील कर्मचारी त्वरित संबंधित विभागातील अधिकाऱ्याला वीजपुरवठा खंडित झाल्याबद्दल माहिती देतील. हे कार्यालय त्यावर कार्यवाही करून वीजपुरवठा पूर्ववत करेल.
शाखा अभियंते / उपविभागीय अभियंते व जनमित्र हे वीजपुरवठा पूर्ववत करत असताना, काही वेळ ग्राहकांच्या फोनला प्रतिसाद न दिल्यामुळे ग्राहकांमध्ये असंतोष निर्माण होण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी ग्राहकांना विनंती आहे की आपली तक्रार डीएसएसमध्ये नमूद करावी. तसेच टॉल फ्री क्रमांक १८००-२३३-३४३५/ १८००१०२३४३५/ १९१२ याचा वापर करावा.
- सुरेश गणेशकर, मुख्य अभियंता, भांडुप परिमंडळ, महावितरण