लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : गेल्या काही महिन्यापासून बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सर्व २४ विभागांमध्ये टप्पेनिहाय पद्धतीने हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे पॉलिक्लिनिक आणि दवाखाने यांची सुरुवात करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. त्याप्रमाणे गांधी जयंती निमित्त मुंबईत विविध ठिकाणी हे दवाखाने सुरु करण्यात आले आहेत.
यामुळे प्राथमिक आरोग्य सेवा अधिक बळकट होण्यास मदत होणार आहे. सध्या महानगरपालिकेचे दवाखाने सकाळी ९ ते दुपारी ४ या वेळेत कार्यरत असतात. या वेळे व्यतिरिक्त ५० ठिकाणी सुरु होणारे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे पॉलिक्लिनिक हे सकाळी ७ ते दुपारी २, दुपारी ३ ते रात्री १० वाजेपर्यंत अथवा रुग्णसंख्या अधिक असल्यास दोन्ही सत्रात कार्यरत असणार आहे.
याप्रकरणी महापालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ मंगला गोमारे यांनी सांगितले की, "हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे पॉलिक्लिनिक आणि दवाखाने २ ऑक्टोबर रोजी सुरु करण्यात आले आहे. नागरिकांना मोठ्या प्रमाणात या आरोग्य सुविधांचा लाभ होणार आहे. ८० टक्क्यांपेक्षा अधिक दवाखाने आणि पॉलिक्लिनिक सुरु करण्यात आले असून येत्या काही दिवसातच सर्व दवाखाने आणि पॉलिक्लिनिक चालू होणार आहे."
मुंबई महापालिकेच्या रुग्णालयात उपचारासाठी दिवसा नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. मात्र हे नवीन दवाखाने चालू झाल्यामुळे गर्दी कमी होण्याची शक्यता आहे. येत्या काही दिवसात याला नागरिकांचा प्रतिसाद कसा मिळतो, हे पाहणे गरजेचे ठरणार आहे.