जीवघेणी सावकारी! ग्रामीण भागाप्रमाणे मुंबईतही बसतोय सावकारी फास  

By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2023 10:22 AM2023-05-01T10:22:28+5:302023-05-01T10:22:46+5:30

पैसे दिले नाही तर बघून घेण्याची धमकी दिली होती. सावकाराच्या मुलासह दोघांना व्ही. पी. रोड पोलिसांनी अटक केली होती.

Like the rural areas, moneylenders are sitting in Mumbai too | जीवघेणी सावकारी! ग्रामीण भागाप्रमाणे मुंबईतही बसतोय सावकारी फास  

जीवघेणी सावकारी! ग्रामीण भागाप्रमाणे मुंबईतही बसतोय सावकारी फास  

googlenewsNext

मुंबई - ग्रामीण भागाप्रमाणे मुंबईतही सावकाराकडून जाच सुरू असल्याचे धक्कादायक वास्तव अनेक घटनांमधून समोर येत आहे. मुंबईत घडलेल्या एका घटनेत, सावकारी कर्जाच्या वसुलीसाठी सावकाराच्या मुलाने साथीदाराच्या मदतीने पालिका कर्मचाऱ्याचे कार्यालयाबाहेरून अपहरण करत त्याला बेदम मारहाण केल्याची घटना माझगावमध्ये घडली आहे, तर दुसरीकडे कुर्ला एल वाॅर्डमधील पालिका कर्मचारी अजूनही सावकारी जाळ्यातून सुटण्यासाठी न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत. अशा प्रकारे विनापरवाना गल्लीबोळांत सावकारांचे अवैध जाळे डोके वर काढताना दिसत आहे. 

जीवघेणी सावकारी
वांगणी येथील रहिवासी असलेले राजेंद्र नागोटकर (५७) पालिकेच्या सी उत्तर विभागाच्या घनकचरा व व्यवस्थापन विभागात सफाई कामगार म्हणून कार्यरत आहेत. २०१४ मध्ये मित्राच्या ओळखीने जगदीश भादरका या सावकाराकडून ७ टक्के व्याजाने ५० हजार घेतले. 
ठरल्याप्रमाणे राजेंद्र हे दर महिन्याला ७ हजार रुपये देत होते. ५ वर्षे नियमितपणे पैसे दिलेसुद्धा. मात्र, कोरोनामुळे कामावर जात नसल्याने राजेंद्र यांना व्याजाची रक्कम देणे शक्य झाले नाही. पुढे जगदीशकडून पैशांसाठी तगादा आणि धमक्यांचे फोन सुरू झाले.  
२२ नोव्हेंबर रोजी मुलगा ऋत्विक (२१) आणि शैलेश बळीद (१८) हे राजेंद्र यांच्या कार्यालयात धडकले. व्याजाच्या पैशासाठी कार्यालयाबाहेरच मारहाण सुरू केली. त्यानंतर या दोघांनी त्यांना दुचाकीवर बसवून माझगाव डॉक परिसरात नेले. तेथेही बेदम मारहाण केली. पैसे दिले नाही तर बघून घेण्याची धमकी दिली होती. सावकाराच्या मुलासह दोघांना व्ही. पी. रोड पोलिसांनी अटक केली होती.

शेकडो जणांकडे सावकारी परवाना...
मुंबईतून शेकडो जणांकडे अधिकृत सावकारी परवाने आहेत. मात्र, त्याचा वापर योग्य रीतीने होत नाही. त्यामुळे अशा सावकाराच्या कामकाजाकडे विशेष लक्ष देणे गरजेचे असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. 

म्हणून थेट परवानेच  होतात रद्द
नियमांपेक्षा जास्त व्याज आकारणाऱ्याविरोधात तक्रारी किंवा गुन्हा दाखल होताच त्यांचे थेट परवानेच रद्द करण्यात येत आहेत. आतापर्यंत अनेकांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत, असे सांगण्यात आले.

Web Title: Like the rural areas, moneylenders are sitting in Mumbai too

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.