मुसळधार पावसामुळे दरड कोसळण्याची शक्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 04:06 AM2021-07-08T04:06:14+5:302021-07-08T04:06:14+5:30
मुंबई : गेल्यावर्षी मुसळधार पावसामुळे मलबार टेकडीवरून केम्प्स कॉर्नर जंक्शनच्या दिशेने जाणाऱ्या बी. जी. खेर मार्गावरील संरक्षक भिंत कोसळली. ...
मुंबई : गेल्यावर्षी मुसळधार पावसामुळे मलबार टेकडीवरून केम्प्स कॉर्नर जंक्शनच्या दिशेने जाणाऱ्या बी. जी. खेर मार्गावरील संरक्षक भिंत कोसळली. त्यामुळे यावर्षी खबरदारी घेत महापालिकेने दक्षिण मुंबईतील टेकडीलगतच्या वस्त्या आणि सोसायट्यांमधील रहिवाशांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.
गेल्यावर्षी ५ ऑगस्ट २०२० रोजी मुसळधार पावसामुळे मलबार टेकडीवरील संरक्षण भिंत कोसळून बी. जी. खेर मार्ग व पाटकर मार्ग खचला. अशा दुर्घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी नेपियन्सी मार्ग आणि आसपासच्या परिसरातील रहिवाशांना सतर्क राहण्याची पालिकेने सूचना केली आहे. तसेच एखादी दुर्घटना घडल्यास कोणती काळजी घ्यावी? याबाबत संबंधित रहिवाशांना सूचना केल्या असून दुर्घटनाग्रस्तांच्या निवासाची व्यवस्था करण्याची तयारी पालिकेने केली आहे.
या ठिकाणी जरा सांभाळून...
नेपियन्सी मार्गावरील आशानगर झोपडपट्टी, जलदर्शन सोसायटीचा मागील भाग, फोर्जेट हिल परिसरातील नवयुग सोसायटी आणि चंदुलाल धोबीघाटच्या पाठीमागील भाग, ब्रीच कँडी रुग्णालयाजवळील भुलाभाई देसाई मार्गालगत असणाऱ्या राजाबली लेनचा शेवटचा भाग, फोर्जेट हिल येथील रहिवासी नगर, मणीयार इमारतीच्या मागील भाग, बी. एन. वाडिया चाळ व एम. पी. मिल कम्पाऊंड (जनता नगर)च्या मागील भाग, बाबूलनाथ परिसरातील लोयलका कम्पाऊंड.
महत्त्वाचे दूरध्वनी क्रमांक :
मनपा मुख्यालय नियंत्रण कक्ष : १९१६
पोलीस : १००
अग्निशमन दल : १०१
रुग्णवाहिका : १०८
विभागीय नियंत्रण कक्ष : ०२२-२३८६४०००.
खबरदारीचे व संरक्षणात्मक उपाय
- जोरदार पाऊस पडत राहिल्यास सतर्क राहावे.
- दगडमातीचा प्रवाह, झाडे पडणे, दगडांचा एकमेकांमधील टकरीचा आवाज अशा प्रकारच्या अनैसर्गिक आवाजांकडे लक्ष द्यावे.
- कुटुंबातील सदस्यांची वैयक्तिक माहिती असणारे कार्ड तयार करावे. ज्यामध्ये व्यक्तीचे नाव, पत्ता, रक्तगट, कार्यालयाचा पत्ता व दूरध्वनी क्रमांक, नातेवाईकांचा पत्ता व दूरध्वनी क्रमांक, अॅलर्जी असलेल्या औषधांची नावे, गंभीर आजार असल्यास त्याचे नाव व त्याकरिता घेत असलेल्या औषधांची नावे, या माहितीचा समावेश करावा.
- घरात जीवनावश्यक वस्तूंचा संच उदा. सुका खाऊ, पाण्याच्या बाटल्या, विजेरी, शिटी इत्यादी तयार ठेवावे.
आणीबाणी परिस्थितीत येथे जमावे
- केवळे मठ मनपा शाळा, बाणगंगा, वाळकेश्वर
- ताडदेव मनपा शाळा, बने कम्पाउंड, ताडदेव