नीट निकालाचा कट ऑफ घसरण्याची शक्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2021 04:08 AM2021-09-14T04:08:58+5:302021-09-14T04:08:58+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : देशभरात रविवारी नीटची परीक्षा सुरळीत पार पडली. मात्र, परीक्षा थोडी कठीण गेल्याने बऱ्याच विद्यार्थ्यांचा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : देशभरात रविवारी नीटची परीक्षा सुरळीत पार पडली. मात्र, परीक्षा थोडी कठीण गेल्याने बऱ्याच विद्यार्थ्यांचा हिरमोड झालेला दिसून आला. यंदा परीक्षेच्या पद्धतीत बदल केल्याने विद्यार्थी गोंधळले आणि त्यात रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्र विषयांचे पेपर मागील वेळीपेक्षा नक्कीच अवघड असल्याने विद्यार्थ्यांना ही परीक्षा थोडीशी अवघड गेल्याची माहिती अभ्यासक आणि काही खासगी कोचिंग क्लासेसमधील प्राचार्यांनी दिली आहे. या पार्श्वभूमीवर मागील निकालापेक्षा निश्चितच या परीक्षेचा कट ऑफ घसरणार असल्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
नीट परीक्षा प्राणिशास्त्र, वनस्पतीशास्त्र, रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्र या चार विभागांत विभागली गेलेली एकूण ७२० गुणांची असते. यामध्ये ३६० गुण हे बायोलॉजीला, तर फिजिक्स आणि केमिस्ट्री या विषयांना प्रत्येकी १८० गुण असतात. यावेळी भौतिकशास्त्र विषयाचा पेपर हा मागील वर्षाशी तुलना करता सारखाच होता, तर रसायनशास्त्राच्या पेपरची पातळी मागील पेपरच्या तुलनेत कठीण असल्याची माहिती राव आयआयटीचे विनय कुमार यांनी दिली. याचप्रमाणे प्राणिशास्त्राच्या पेपरची काठिण्य पातळीही यंदा जास्त होती, तर वनस्पतीशास्त्राच्या पेपरची तुलना करता काठिण्य पातळी मागील वेळी एवढीच होती, असे त्यांनी म्हटले. एकूणच विद्यार्थ्यांच्या वयाचा निकष हा त्यांच्या रँकिंगसाठी महत्त्वाचा ठरणार आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. सोबतच ७०० गुणांवर यंदा जवळपास १०० विद्यार्थीच पोहोचू शकतील, असा अंदाज वर्तविला आहे.
कार्ला शुक्ला क्लासेसचे प्राध्यापक आर. डी. शुक्ला यांनीही यंदा नीटचा कट ऑफ खाली येण्याची शक्यता वर्तवली आहे. मागील वर्षीपेक्षा पेपरची एकूण काठिण्य पातळी अधिक असल्याचे सांगत यंदा २०० प्रश्नांपैकी विद्यार्थ्यांना १८० प्रश्न त्याच वेळेत सोडवायचे असल्याने विद्यार्थी भांबावून गेल्याचे त्यांनी म्हटले. प्रश्नपत्रिका सोडविताना विद्यार्थ्यांचा क्रम जीवशास्त्र, रसायनशास्त्र आणि मग भौतिकशास्त्र असा असतो. मात्र, आधीच प्रत्येक विभागात ५ जास्तीचे प्रश्न आणि त्यात रसायनशास्त्र पेपरची काठिण्य पातळी जास्त, त्यामुळे विद्यार्थी संभ्रमित झाले आणि भौतिकशास्त्र पेपर सोडवितानाही त्यांची घाई झाल्याने विद्यार्थ्यांना यंदाची नीट परीक्षा कठीण गेल्याची माहिती शुक्ला यांनी दिली.