लीलावती रुग्णालयात १,२५० कोटींचा घोटाळा; माजी विश्वस्ताविरुद्ध तिसरा गुन्हा, तपास सुरू
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2025 07:12 IST2025-03-12T07:11:49+5:302025-03-12T07:12:05+5:30
वांद्रे पोलिसांनी माजी विश्वस्तांसह १७ जणांविरुद्ध गुन्हा नोंदवला

लीलावती रुग्णालयात १,२५० कोटींचा घोटाळा; माजी विश्वस्ताविरुद्ध तिसरा गुन्हा, तपास सुरू
मुंबई : प्रसिद्ध 'लीलावती' रुग्णालयात तब्बल १२५० कोटींचा घोटाळा झाला असल्याचा आरोप रुग्णालयाचे संचालक प्रशांत मेहता यांनी केला आहे. रुग्णालयाच्या माजी विश्वस्तांनीच पुरवठादार कंपन्यांना हाताशी धरून ही अफरातफर केल्याचा ठपका ठेवला आहे. त्यांच्या तक्रारीवरून वांद्रे पोलिसांनी माजी विश्वस्तांसह १७ जणांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. हा विश्वस्तांविरुद्धचा हा तिसरा गुन्हा आहे.
निधीच्या अभावामुळे रुग्णालयातील रुग्णांना पुरवण्यात येणाऱ्या सेवांवर परिणाम होत आहे, अशी तक्रार या ट्रस्टने केली आहे. लीलावती कीर्तिलाल मेहता मेडिकल ट्रस्टच्या (एलकेएमएमटी) ऑडिट दरम्यान हा सर्व प्रकार लक्षात आला. फॉरेन्सिक ऑडिटनंतर, ट्रस्टच्या माजी विश्वस्तांनी मोठ्या प्रमाणात अनियमितता, आर्थिक फसवणूक आणि निधीचा गैरवापर केल्याचे लेखापरीक्षकांनी उघड केले. वैद्यकीय क्षेत्रातील आतापर्यंतचा सर्वात मोठा घोटाळा आहे, असा दावा ट्रस्टचे विद्यमान संचालक प्रशांत मेहता यांनी केला आहे. तसेच ईडीकडेही तक्रार केली असल्याचेही नमूद केले आहे. दरम्यान, माजी विश्वस्त हे दुबई आणि बेल्जियममध्ये असल्याची माहिती मुंबईचे माजी पोलिस आयुक्त आणि लीलावती हॉस्पिटलचे सध्याचे कार्यकारी संचालक परमबीर सिंग यांनी दिली.
लॉकरमधील दागिनेही पळवले
गुजरातमधील भागलपूरमध्ये या ट्रस्टचे लहान हॉस्पिटल आहे. प्रशांत मेहता यांच्या आजीने भविष्यात नवीन हॉस्पिटलच्या उभारणीसाठी सोने, चांदी आणि हिरे लॉकरमध्ये ठेवले होते. पण, माजी विश्वस्तांनी ते दागिनेदेखील पळवून नेले असून त्यांची बाजारातील किंमत ४४ कोटी आहे, असा आरोप प्रशांत मेहता यांनी केला.
आरोपी कोण?
चेतन मेहता, निकेत मेहता, रश्मी मेहता, भावीन मेहता, सुशीला मेहता, आयुष्यमान मेहता, निमेश शेट, अकना मेडिकल प्रा. लिमिटेड, सौरभ पांडे, महादेवन नारायणमोनी, कल्पना श्रीनिवास, ईशा सादना, धीरज जैन, श्रीजी डिस्ट्रिब्युटर्स फार्मा प्रा. लिमिटेड, शंकर बदाम, वर्धमान हेल्थ स्पेशालिटीज, मयांक कपूर यांचा दाखल गुन्ह्यात समावेश आहे.
तक्रारीत काय?
तक्रारीनुसार, १४ डिसेंबर २०२३ पर्यंत चेतन, निकेत, रश्मी, भावीन, सुशीला, आयुष्यमान आणि निमेश यांच्या बेकायदेशीर नियंत्रणात लीलावती रुग्णालय होते.
अॅक्ना मेडिकल प्रा. लिमिटेडचे काही संचालक आणि अन्य आरोग्य क्षेत्रातील व्यावसायिकांना हाताशी घेत माजी विश्वस्तांनी गैरव्यवहार केला. श्रीजी आणि वर्धमान यादेखील अॅक्नाच्या ग्रुप कंपन्या असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
या आरोपींनी वैद्यकीय उपकरणे, फर्निचर, संगणक, इतर उपकरणे, वैद्यकीय आणि कायदेशीर पुस्तके, वाहन आणि रुग्णवाहिका, सर्जिकल वस्तू, औषधांच्या अफरातफर करून ट्रस्टच्या निधीतून बाराशे कोटींहून अधिक रुपयांवर हात साफ केल्याचा आरोप करण्यात आला आहे.