Join us

दादर येथे आढळले चुन्याच्या घाण्याचे चाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 07, 2021 4:08 AM

मुंबई : दादर पूर्व येथे दादासाहेब फाळके मार्गावर चुन्याच्या घाण्याचे चाक (दगड) आढळून आले. या दगडाचा वापर जवळपासच्या इमारतींच्या ...

मुंबई : दादर पूर्व येथे दादासाहेब फाळके मार्गावर चुन्याच्या घाण्याचे चाक (दगड) आढळून आले. या दगडाचा वापर जवळपासच्या इमारतींच्या बांधकामावेळी ब्रिटिशकाळात किंवा त्यानंतर केला गेला असण्याची शक्यता आहे. पुरातन असल्यामुळे या चाकाचे योग्य ठिकाणी जतन, संवर्धन केले जावे, असे म्हणणे ऐतिहासिक वास्तू संवर्धक चंदन विचारे यांनी मांडले आहे. त्यासंबंधी स्थानिक नगरसेविकेशी बोलणे सुरू आहे, असेदेखील त्यांनी सांगितले.

गडाच्या बांधकामामध्ये प्रामुख्याने चुन्याचा वापर केला जात होता. यासाठी चुना दळण्यासाठी घाण्याचा वापर केला जाई. घाण्याच्या सहाय्याने चुना गडावरच बनवला जात होता. यामध्ये गुळ, भाताचे तूस, पाणी पदार्थांचे मिश्रण दगडी जात्याने बैलांमार्फत फिरवले जात असे. असे घाणे रोहिडा, तिकोणा, विसापूर, गोवळकोट ऊर्फ गोविंदगड, विजयदुर्ग अशा गडांवर पहायला मिळतात. गडांवरील बांधकामाकरिता दगडी एकावर एक रचण्याकरिता चुन्याच्या घाण्याचा उपयोग होत असे. त्यात काळा गुळ, चुना, शिसे, भाताचा भराडा असे मिश्रण सर्रास पूर्वी वापरायचे.

सतराव्या शतकापर्यंत अशा प्रकारे दगड काढले जात होते. तटबंदी बुरूज बांधण्यासाठी मोठ्या प्रमाणावर चुना लागत असे. चुन्याच्या घाण्याच्या सहाय्याने चुना किल्ल्यावरच बनवला जात असे. चुन्याचा घाणा बनवण्यासाठी कातळावर गोल चर खोदला जात असे. या चराच्या गोलाच्या मधोमध एक खांब रोवून त्या खांबाला आडवा खांब जोडलेला असे. या आडव्या खांबाला दगडी जात्याचे चाक जोडलेले असे. चरात चुना, गूळ, भाताचे तूस आणि पाणी यांचे योग्य प्रमाणात मिश्रण करून त्यावरून जात्याचे दगडी चाक बैलजोडीमार्फत फिरवले जात असे. तयार झालेले मिश्रण साठवण्यासाठी हौद बांधलेले होते. अशा प्रकारचे जाते इतरही किल्ल्यांवर पाहायला मिळतात, असेदेखील चंदन विचारे यांनी सांगितले.