Join us

ऑनलाइन शिक्षणाला मर्यादा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2020 4:25 AM

...................................................कोविड महामारीच्या परिस्थितीत मुले शाळेत जाऊ शकत नाहीत. एका बाजूला संसर्गाची दहशत तर दुसऱ्या बाजूला शिक्षणाचे पुढे काय ...

...................................................

कोविड महामारीच्या परिस्थितीत मुले शाळेत जाऊ शकत नाहीत. एका बाजूला संसर्गाची दहशत तर दुसऱ्या बाजूला शिक्षणाचे पुढे काय होणार, याची पालक, विद्यार्थी तसेच शिक्षकांना चिंता आहे. नोकरीच्या उंबरठ्यावर असो की नुकताच शाळेच्या प्रथम वर्षात प्रवेश घेतलेला असो. ही परिस्थिती फक्त महाराष्ट्रापुरती मर्यादित नव्हती तर देशभर हीच समस्या होती. मग पर्याय होता ऑनलाइन शिक्षणाचा, देशाच्या अनेक भागांत शिक्षण ऑनलाइनने पोहोचणार होते. ऑनलाइन शिक्षण म्हणजे सर्वात प्रथम इंटरनेट, स्मार्टफोन, मोबाइल रेंज अशा अनेक बाबींवर शिक्षण अवलंबून होते. मग दुसरा पर्याय होता टेलिव्हिजनच्या माध्यमातून, मोबाइल ॲपद्वारे ऑनलाइन क्लासेस, शिक्षकांनी घरोघरी जाऊन शिकवण्याचा. खुल्या वातावरणात छोटे छोटे ग्रुप करून शिक्षण द्यावे, रेडिओच्या माध्यमातून शिक्षण द्यावे, अशा अनेक संकल्पनांतून विद्यादान सुरू झाले. पण सगळ्यालाच एक मर्यादा होती.

विद्यार्थी मोबाइलला रेंज मिळत नसल्याने टेकाडावर जाऊन बसायचे. शेवटी विद्यार्थीदशा असल्याने फार गंभीरतेने या शिक्षणाकडे मुलांनी पाहिले नाही, कारण समोर शिक्षक नाही. ‘लक्ष दे, फळ्यावरचे वाच’, असे सांगणारे कुणीच नव्हते. काही अडले, समजले नाही तर विद्यार्थी आणि शिक्षक यामधील इंटरॲक्शन संवाद नव्हता. शाळेची शिस्त नव्हती. मधल्या काळात कधीही कारण न सांगता स्क्रीनवरून गायब होऊ शकत होता. ग्रामीण भागातील, निमशहरी भागातील तर शहरी व उच्चभ्रू भागातील समस्या वेगवेगळ्या होत्या.

महाराष्ट्रातील महाराष्ट्र स्टेट कौन्सिल ऑफ एज्युकेशनल, रिसर्च ॲण्ड ट्रेनिंग यांनी युनिसेफसोबत एक सर्व्हे केला. तो असा आहे, ५९.८ टक्के मुलांना स्मार्ट फोन, इंटरनेटची व्यवस्था होती. ३० टक्के मुले दीक्षा ॲप वापरत होती, ७२.२ टक्के लोकांकडे किंवा पालकांकडे डिजिटल स्क्रीन नव्हते, ६६.४ टक्के लोकांकडे स्मार्ट फोन नव्हते. फक्त ०.८ टक्के विद्यार्थ्यांकडे डेस्कटॉप, लॅपटॉपची सोय आहे. अगदी शहरी भागातही या आवश्यक सर्वांची उपलब्धता शंभर टक्के नाही, त्यातही उणिवा आहेत. १७ टक्के लोकांकडेच स्मार्टफोन, इंटरनेट, रेडिओ, टीव्ही आहेत, ही बाब या सर्व्हेमुळे समोर आली. त्यामुळे या माध्यमातून शिक्षण १०० टक्के विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणे अशक्य आहे. एकंदर पाहिले तर ५०.५ टक्के विद्यार्थ्यांपर्यंत ऑनलाइन शिक्षण किंवा आवश्यक मटेरियल पोहोचू शकते ही गोष्ट नाकारता येणार नाही.

महाराष्ट्राच्या एकूण ऑनलाइन शिक्षणाचा लेखाजोखा पाहिला तर अमरावती विभाग ऑनलाइन शिक्षणाबाबत सर्वात मागे राहिला, कारण हा भाग तसा उंच-सखल, जंगलांनी व्यापलेला आहे. इंटरनेट, मोबाइल फोन हे प्रकार दुरापास्त आहेत. त्यानंतर कोकण साक्षरतेत पुढे असले तरी मोबाइल, इंटरनेटबाबत खूपच कठीण व्यवस्था. ४०-५० गावांत मुळीच रेंज मिळत नाही. अजूनही बऱ्याच मोबाइल टॉवरची आवश्यकता आहे. त्यानंतर विदर्भ, नागपूर येथेही ऑनलाइन शिक्षण दुरापास्त झाले होते. दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे रिचार्ज करण्यासाठी कोविड काळात व त्यानंतरही पैशांची कमतरता होती, त्यामुळे २००-२५० रुपयांचा डेटापॅक कुठून परवडणार? त्यामुळे शिक्षण घेता घेता इंटरनेट खंडित व्हायचे प्रकार घडले. अगदी डिग्रीचा अभ्यास करणाऱ्यांनाही आर्थिक विवंचनेचा फटका अभ्यासात बसला.

रिपोर्टनुसार २०११ नंतर इंटरनेटचा वापर आणि त्याची उपलब्धता वाढली. पूर्वी ती ४२ टक्के होती. २०१३ मध्ये ४५ टक्के झाली. २०१५ मध्ये झालेल्या सर्व्हे स्टडीनुसार अमेरिकेत २४ टक्के विद्यार्थी सतत ऑनलाइन असतात. ऑनलाइनचा मुख्य उद्देश शिक्षण न राहता फेसबुक, इन्स्टाग्राम, स्नॅपचॅट, ट्विटर, गुगल या माध्यमांचा वापर होतो. अमेरिकेचा रिपोर्ट पाहिला तर एकूण लोकांपैकी ९२ टक्के विद्यार्थी इंटरनेट हे इंटरॲक्शनसाठी वापरतात. हे सर्व अमेरिकन टिन एजर्स आहेत. या सर्व आकडेवारीत स्मार्ट फोन वापरणाऱ्यांची संख्या ७५ टक्के आहे. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे १२ टक्के लोकांकडे सेल फोनच नाही. मात्र ८८ टक्के लोकांकडे सेल फोन उपलब्धता होती.

नॅशनल कन्झ्युमर लीग ऑफ अमेरिका यांच्या म्हणण्याप्रमाणे ८ ते १२ वयोगटात सेल फोन वापर हा सर्वात जास्त आहे. साधारणतः हा त्यांच्या पालकांनी त्यांना विकत घेऊन दिलेला असतो. पालक सर्व्हिसेस उदा. नेटवर्क, टेक्स्टिंग सर्व्हिस, हँडसेट कॉस्ट याचा विचार करतात. भारतात आणि महाराष्ट्रात या सर्वाचा विचार मोठ्या प्रमाणात होतो. बऱ्याच घरांत एकच फोन असतो, अगदी मुंबईतील कनिष्ठ मध्यमवर्गातसुद्धा आणि सोयीनुसार कुटुंबप्रमुख दुसऱ्यांना देतात. त्यामुळे त्यांच्यासाठी ऑनलाइन शिक्षण कठीणच होते. भारतीय परंपरा मग ती गुरुकुलाची असो की शाळेच्या चार भिंतीतील शिक्षणाची असो, विद्यार्थीदशेतील मुलांवर संस्कार होणे आवश्यक आहे आणि ते ऑनलाइन शिक्षणात होऊ शकत नाहीत. मग शिक्षकाविषयी कमेंट्स लिहिणे, असांस्कृतिक वागणे हे सुरू होते. पालक शिक्षकांच्या बाबतीत चुका शोधत राहतात. त्यामुळे एकंदरीत गोंधळ सुरू होतो, पण कोविड ई-लर्निंग या नवीन पर्वाला सुरुवात झाली आहे. म्हणजेच सिल्वर लायनिंग इन ब्लॅक क्लाउड्स.

- डॉ. दीपक सावंत

(लेखक राज्याचे माजी आरोग्यमंत्री आहेत.)