अंधेरी आरटीओत पुन्हा ‘लिमोझीन’ जप्त
By admin | Published: May 30, 2017 06:46 AM2017-05-30T06:46:39+5:302017-05-30T06:46:39+5:30
बेकायदेशीरपणे मॉडीफाय करण्यात आलेल्या कारवर पुन्हा एकदा अंधेरी प्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने जप्तीची कारवाई
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : बेकायदेशीरपणे मॉडीफाय करण्यात आलेल्या कारवर पुन्हा एकदा अंधेरी प्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने जप्तीची कारवाई करण्यात आली. मॅक्सी कॅबचा परवाना असलेल्या क्रिस्लर कंपनीच्या कारचे रूपांतर २६ फुटी शानदार लिमोझीनमध्ये करण्यात आले होते. आठवड्याभरात दुसऱ्यांदा अंधेरी आरटीओच्या भरारी पथकाने ही कामगिरी बजावली आहे.
गोरेगाव येथील पंचतारांकित हॉटेलजवळून ही मॉडीफाय कार जप्त करण्यात आली. २००७ मध्ये कारची निर्मिती करण्यात आली असून २०१२ मध्ये दिल्ली येथे या कारची नोंदणी करण्यात आलेली आहे. चालकासह १० प्रवासी क्षमता असलेल्या या कारला मॅक्सीकॅबचा परवाना देण्यात आला आहे. एका खासगी कार्यक्रमासाठी दिल्ली येथून मुंबईत ही कार आणण्यात आली होती. मॉडीफाय करण्याबाबत कागदपत्रे आणि अन्य माहितीची चौकशी केल्यानंतर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती भरारी पथकाच्या वरिष्ठ निरीक्षक आनंदराम वागळे यांनी दिली.
या कारमध्ये एलईडी स्क्रीन, छोटेखानी बार, एलईडी लाइट अशा अन्य सुविधा आहेत. विशेष म्हणजे अंधेरी आरटीओची ‘आलिशान कार जप्ती’ची आठवड्याभरातील ही दुसरी कारवाई आहे. पंजाबमध्ये नोंदणीकृत निस्सान कंपनीच्या कारचे रूपांतर बेकायदेशीरपणे २४ फुटी लिमोझीनमध्ये करण्यात आले होते.