"मंत्रालयाबाहेर रांगा, हे सरकारचे अपयशच"; विजय वडेट्टीवार यांची टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2023 08:30 AM2023-11-02T08:30:01+5:302023-11-02T08:30:18+5:30
सुरक्षेची कारणे देत सर्वसामान्यांना मंत्रालयाबाहेर ताटकळत उभे केले जात असल्याचा आरोप
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: मंत्रालयात प्रवेशासाठी जाचक अटी केल्याने प्रवेशद्वारावर लांबच लांब रांगा लागत असल्याचे ‘लोकमत’ने समोर आणल्यानंतर आता विरोधी पक्षांनीही याबाबत सरकारला धारेवर धरले आहे. सरकारचा ‘शासन आपल्या दारी’ हा कार्यक्रम अपयशी ठरल्यानेच जनतेला शासनाच्या दारी जावे लागत आहे. मंत्रालयाबाहेरच्या रांगा म्हणजे जनता जनार्दनाची कामे होत नसल्याचा पुरावा आहे, अशी टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.
सुरक्षेची कारणे देत सर्वसामान्यांना मंत्रालयाबाहेर ताटकळत उभे केले जात आहे. त्यामुळे मंत्रालयातील प्रवेशासाठी संध्याकाळी उशिरापर्यंत लोकांना ताटकळत उभे राहावे लागते. या रांगेमुळे अनेकांना सायंकाळी उशिरा मंत्रालयात प्रवेश मिळतो. तोपर्यंत कार्यालयीन कामकाजाची वेळ संपलेली असते. त्यामुळे हताश होऊन नागरिक परत जात आहेत. नागरिकांचे हाल सरकारने थांबविले पाहिजेत, असेही वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.