झाडांच्या कापाकापीत अवैध गाड्यांच्या रांगा; कंत्राटदारांच्या पालिकेकडे तक्रारी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2024 09:42 AM2024-04-18T09:42:37+5:302024-04-18T09:43:52+5:30
वाहन चालकांसोबत वादाचेही प्रसंग.
मुंबई : पावसाळापूर्व कामांचा एक भाग म्हणून मोठ्या झाडांच्या, विशेषतः जोरदार वारे वाहत असताना धोकादायक ठरू शकणाऱ्या झाडांच्या फांद्या शास्त्रीय पद्धतीने छाटणीची कामे मुंबई महापालिकेच्या उद्यान विभागाकडून सुरू आहेत. मात्र, या कामांमध्ये रस्त्यांच्या कडेला, अनेकदा रस्त्यांवर अवैध पार्किंग केलेल्या वाहनांचा अडथळा येत आहे, अशा तक्रारी झाडांच्या छाटणीसाठी नेमलेल्या कंत्राटदारांकडून पालिकेकडे आल्या आहेत.
दरम्यान, या वाहनांच्या अडथळ्यांमुळे ती झाडे आणि फांद्या तशाच राहून पावसात त्यामुळे वित्तहानी अथवा जीवितहानी होण्याची भीती पालिकेकडून व्यक्त केली जात आहे. उद्यान विभागाने यंदा मुंबईतील आकाराने मोठ्या अशा सुमारे १ लाख ८६ हजार २४६ झाडांचे सर्वेक्षण केले. त्यात, रस्त्यांच्या कडेला सुमारे १ लाख ११ हजार ६७० झाडे आहेत. ५ एप्रिलपर्यंत १२ हजार ४६७ झाडांच्या फांद्यांची छाटणी करण्यात आली आहे. तर, ७ जूनअखेरपर्यंत ही कामे पूर्ण करण्यात येणार आहेत. त्यासाठी पालिकेच्या सर्व प्रशासकीय विभागांमध्ये या कामी यंत्रसामग्री, मनुष्यबळ उपलब्ध
आहे.
मात्र, मुंबईत अनेक ठिकाणी अवैध उभ्या केलेल्या वाहनांमुळे झाडांच्या छाटणीसाठी नेमलेल्या कंत्राटदारांना कामे करताना अडचणी येत आहेत. अनेकदा या वाहनांचे चालक, मालक संबंधित परिसरात उपस्थित नसतात. त्यामुळे विनापरवानगी वाहन हटविता येत नाही. अनेकदा या कंत्राटदारांसोबत वाहनमालकांचे वादविवादही होत असल्याच्या तक्रारी पालिकेकडे आल्या आहेत. त्यामुळे पालिकेच्या उद्यान विभागाने अवैध पद्धतीने उभी असणारी वाहने हटविण्याच्या सूचना नागरिकांना केल्या आहेत.
तीन हजारांहून अधिक नोटिसा-
गृहनिर्माण सहकारी संस्था (हाउसिंग सोसायटी), शासकीय-निमशासकीय संस्था, खासगी जागा इत्यादींमध्ये असणाऱ्या झाडांची निगा राखण्याची जबाबदारी ही संबंधित मालकाची किंवा वापरकर्त्याची असते. मात्र, संबंधितांनी झाडांची छाटणी १२ एप्रिलपर्यंत न केल्यामुळे पालिकेने तीन हजार ६९० नोटिसा बजावल्या आहेत.
वॉर्ड झाडे छाटणी
ए ८५८३ ६३००
बी १६९४ १२४
सी १४८५ १४८५
डी ६०७५ ३९५०
इ ६९०० ६९००
एफ दक्षिण ९४३२ ६४३२
एफ उत्तर १३६८३ ७५४३
जी उत्तर १०७४१ ५२०५
जी दक्षिण ७१६९ ३९७८
एच पूर्व ५७५६ ५७५६
एच पश्चिम ७३५९ ४८१६
के पूर्व ६७०१ ६७०१
के पश्चिम १३१३४ १३१३४
पी दक्षिण ११३५५ ९८३६
पी उत्तर १२०५६ ८७००
आर दक्षिण १०९८२ १०२००
आर मध्य ९५६४ ८७००
आर उत्तर ४३७७ ३९८४
एल ३८८१ ३७५२
एम पूर्व ७८०४ ४२८९
एम पश्चिम ८१६६ ६१०३
एन ७२८० ६२६८
एस ६९५८ ५७५८
टी ६९२४ ४२२८