लिंगायत हा हिंदू धर्माचाच भाग - तावडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2018 05:33 AM2018-03-14T05:33:17+5:302018-03-14T05:33:17+5:30
लिंगायत समाज हा स्वतंत्र धर्म नाही. तो हिंदू धर्माचाच एक भाग आहे. त्यामुळे या समाजाला स्वतंत्र धर्म व अल्पसंख्याक समाजाचा दर्जा देता येत नाही.
मुंबई : लिंगायत समाज हा स्वतंत्र धर्म नाही. तो हिंदू धर्माचाच एक भाग आहे. त्यामुळे या समाजाला स्वतंत्र धर्म व अल्पसंख्याक समाजाचा दर्जा देता येत नाही. केंद्र सरकारच्या गृहखात्यातील रजिस्ट्रारने पत्राद्वारे ही बाब राज्य सरकारला कळविली आहे. त्यामुळे लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्माचा दर्जा आणि अल्पसंख्याकचा दर्जा देता येत नाही, अशी माहिती अल्पसंख्याक मंत्री विनोद तावडे यांनी शुक्रवारी विधान परिषदेत तारांकित प्रश्नांच्या लेखी उत्तरात दिली.
राष्ट्रवादीचे सदस्य हेमंत टकले, नरेंद्र पाटील, किरण पावसकर, आनंद ठाकूर, सुनील तटकरे, विद्या चव्हाण, निरंजन डावखरे आदींनी याबाबतचा तारांकित प्रश्न मांडला होता. त्यावर, राज्यातील लिंगायत समाजाला अल्पसंख्याकाचा दर्जा मिळावा म्हणून राज्यभरात मोर्चे काढून २८ जानेवारी २०१८ रोजी कोल्हापूर येथील जिल्हाधिकाºयांना निवेदन दिले होते. २६ आॅगस्ट २०१४ रोजी मंत्रिमंडळाच्या बैठकीत झालेल्या निर्णयाची अंमलबजावणी त्वरित करून लिंगायत धर्माला स्वतंत्र धर्म म्हणून संवैधानिक मागणी करण्यासाठी केंद्र सरकारकडे शिफारस करावी, धार्मिक अल्पसंख्याक दर्जा मिळावा आदी मागण्या निवेदनात केल्या होत्या. मात्र, २८ आॅगस्ट २०१४ रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत लिंगायत समाजास अल्पसंख्याक समाजाचा दर्जा देण्याबाबतचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठविण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. अल्पसंख्याक कार्य मंत्रालयाने राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाचा १३ जून २०१४ रोजीचा अभिप्राय राज्य शासनास पाठविला आहे. त्यात लिंगायत हा स्वतंत्र धर्म नसून हिंदू धर्माचा एक पंथ असल्याचे नमूद केले आहे. त्यामुळे लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्माचा व अल्पसंख्याक दर्जा देणे अनुज्ञेय नाही, असे मंत्री तावडे यांनी म्हटले आहे.