मुंबई : इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, मुंबईने अभियांत्रिकी पदवीधर ॲप्टिट्यूट टेस्ट इन इंजिनीअरिंग(गेट २०२१)साठी मॉक टेस्टची get.iitb.ac.in ही लिंक उपलब्ध करून दिली आहे. उमेदवारांना त्यांचे नोंदणी क्रमांक व पासवर्डने साईन इन करावे लागेल.
...................................
उत्सव विशेष गाड्या ३ जानेवारीपर्यंत धावणार
मुंबई : पश्चिम रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी उत्सव विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला. या गाड्या ३ जानेवारीपर्यंतच चालविण्यात येतील. याअंतर्गत पश्चिम रेल्वेकडून उधना ते मंदुआदीह, ओखा आणि हावडा, पोरबंदर आणि हावडा, इंदूर आणि राजेंद्रनगर आणि गोरखपूरदरम्यान सहा विशेष गाड्या चालवण्यात येतील.
...................................
ऑनलाइन बीअरसाठी मोजावे लागले ४८ हजार
मुंबई : ऑनलाईन बीअरसाठी अंधेरीतील ३२ वर्षीय महिलेला ४८ हजार ११६ रुपये मोजावे लागले. त्यांनी गुगलवरून बीअर शॉपीचा शोध घेतला. यातूनच मिळालेल्या क्रमांकावर संपर्क साधून, बीअरची विचारणा केली. त्यांना गुगल पेवरून पैसे भरण्यास सांगितले. गुगल पेची माहिती देताच त्यांच्या खात्यातून तब्बल ४८,११६ रुपये काढण्यात आल्याचा संदेश मोबाईलवर धडकला. याप्रकरणी आंबाेली पाेलीस अधिक तपास करीत आहेत.
...................................
एसटी कर्मचारी, अधिकाऱ्यांचे वेतन एकाच दिवशी
मुंबई : एसटी महामंडळात अधिकाऱ्यांचे वेतन महिन्याच्या १ तारखेला व कर्मचाऱ्यांचे वेतन ७ तारखेला होत होते. अधिकाऱ्यांना वेतन दिल्यानंतर कर्मचाऱ्यांना वेतन मिळत हाेते. अधिकारी आणि कर्मचारी यांच्या वेतनातील दिवसाची ही तफावत दूर करण्यासाठी यापुढे दाेघांच्या वेतनासाठी प्रत्येक महिन्याची ७ तारीख निश्चित करण्यात आली आहे.
--------------------------