मुंबई : वाहन आणि वाहन नोंदणी प्रमाणपत्र आधारकार्डला लिंक केल्यास प्रादेशिक परिवहन कार्यालयातील (आरटीओ) गर्दी बरीच कमी होईल आणि वाहनचालकांची एजंटपासून सुटका होईल, असे परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे यांनी सांगितले.
परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे म्हणाले की, केंद्र सरकारने वाहन परवाना आणि वाहन नोंदणी प्रमाणपत्र ‘आधार’शी लिंक करण्यासंदर्भात एक प्रारूप अधिसूचना जारी केली आहे. वाहन आणि सारथी प्रणाली आधारशी जोडली गेली की, आरटीओ कार्यालयातील गर्दी २० टक्क्यांपर्यंत कमी होईल. या बदलानंतर ड्रायव्हिंग लायसन्स आणि व्हेईकल फिटनेसशी संबंधित कामांसाठी मोजक्याच लोकांना आरटीओ कार्यालयात भेट द्यावी लागेल, असे परिवहन आयुक्तांनी सांगितले. आधार लिंकमुळे आरटीओंना भेट देऊन कागदपत्रे सादर करण्याची गरज नाहीशी होईल, असेही ते म्हणाले.
सध्या राज्यभरातील ५० प्रादेशिक परिवहन कार्यालयांमध्ये दररोज सुमारे १.५० लाख लोक येतात. आधारकार्ड ड्रायव्हिंग लायसन्स आणि आरसीशी लिंक झाल्यानंतर ही संख्या ४० हजार किंवा त्याहूनही कमी होईल.
अविनाश ढाकणे, परिवहन आयुक्त