मुंबई : भायखळ्यातील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयात लवकरच गुजरातच्या सिंहाची गर्जना ऐकायला मिळणार आहे. तर इंदौरच्या प्राणिसंग्रहालयातील लांडगा आणि अस्वलाची जोडीही येणार आहे. याबदल्यात ग्रॅट झेब्राची प्रत्येकी एक जोडी दोन्ही प्राणिसंग्रहालयाला मुंबई महापालिका आणून देणार आहे.
प्राणिसंग्रहालयात गेल्या वर्षभरात वाघ, बिबट्या, तरस, बारशिंगा, सांबर असे काही प्राणी आणण्यात आले आहेत. पुढील वर्षात आणखी काही नवीन प्राणी आणण्यात येणार आहेत. त्यानुसार गुजरात येथील साकरबाग प्राणिसंग्रहालयातून सिंहाच्या दोन जोड्या घेऊन त्याबदल्यात ग्रॅट झेब्राच्या दोन जोड्या देण्याचे ठरले. त्यासाठी होणारा खर्च अधिक असल्याने पालिकेने गुजरातकडून सिंहाची केवळ एक जोडी घेऊन त्याबदल्यात ग्रॅट झेब्राची जोडी देण्याचा निर्णय आता घेतला आहे. इंदौर येथील कमला नेहरू प्राणिसंग्रहालयाने ग्रॅट झेब्राची फक्त एक जोडी घेऊन राणी बागेला सिंह, लांडगा व अस्वल यांची प्रत्येकी एक जोडी देण्याची तयारी दाखवली आहे.
अशी हाेणार देवाणघेवाण
विदेशातून ग्रॅट झेब्राची जोडी मागवून गुजरात आणि इंदौरच्या प्राणिसंग्रहालयाला देण्यासाठी मुंबई महापालिकेने मे. गोवाट्रेड फार्मिंग कंपनी या ठेकेदाराला कंत्राट देण्याचा प्रस्ताव स्थायी समितीच्या पटलावर मांडला आहे. त्यासाठी ८४ लाख ६४ हजार १९६ रुपये खर्च महापालिका करणार आहे.या प्रस्तावाला स्थायी समितीची मंजुरी मिळताच पुढील सहा महिन्यांत या ठेकेदाराने ग्रॅट झेब्राची जोडी विदेशातून आणून इंदौर व गुजरात येथील प्राणिसंग्रहालयाला देण्याची अट प्रस्तावात आहे.