मुंबई : गुजरातच्या गीर जंगलामध्ये २४ सिंहांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली. मृत सिंहांच्या शवविच्छेदनानंतर त्यांची फुप्फुसे निकामी झाल्याचे निदर्शनास आले. या पार्श्वभूमीवर ‘खम्मा गीर ने’ या संस्थेने गेल्या ३ वर्षांत ७० हजार किलोमीटरचा प्रवास करून गीरच्या जंगलातील धक्कादायक वास्तव डॉक्युमेंट्री स्वरूपात मांडले आहे. येथील सिंहांचे पालनहार म्हणून काम करणाऱ्या मालधारी जमातीचे अस्तित्व धोक्यात आल्याने सिंहांकडे दुर्लक्ष होत असल्याचे यात म्हटले आहे.
प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिरमध्ये मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत गीर जंगलाचे वास्तव डॉक्युमेंट्री स्वरूपात दाखविण्यात आले. गीरच्या जंगलामध्ये मालधारी (गवळी) जमातीचे बांधव राहतात. ते गेल्या कित्येक वर्षांपासून सिंहांचे संगोपन करीत आहेत. या लोकांच्या मनात सिंहाबद्दल खूप आपुलकी आणि प्रेम आहे. त्यांचा पिढीजात व्यवसाय हा दूध विकण्याचा असून, एखादे जनावर मेल्यावर ते सिंहांना खाद्य म्हणून देतात.१९७१-८० सालामध्ये येथील ५८८ स्थानिक मालधारी लोकांना जंगलातून बाहेर काढण्यात आले. पुनर्वसनाच्या नावाखाली सर्व प्रकारच्या सुख-सुविधा पुरविल्या जातील, असे त्यांना सांगण्यात आले होते. परंतु, सध्या ही कुटुंबे रस्त्यावर आली असून येथील सिंहांकडे लक्ष देणारे कोणी नसल्याने वन्यजीवांचे अस्तित्व धोक्यात आले आहे.
तसेच येथील वनविभाग वन्यप्राण्यांकडे दुर्लक्ष करीत असल्याचेही मालधारी जमातीच्या लोकांनी संस्थेला सांगितले. गीर जंगलातील सिंहांची सद्य:स्थिती, वनविभागाची कामगिरी आणि मालधारी जमात यांचे वास्तव डॉक्युमेंट्रीमध्ये मांडण्यात आले आहे.गैरमार्गाने होते उत्खननगीरच्या जंगलात पूर्वी ४०० प्रकारच्या गवताच्या प्रजाती होत्या. पैकी सध्या केवळ १० टक्केच शिल्लक आहेत. गीरमध्ये मोठ्या प्रमाणात रात्रीच्या वेळी गैरमार्गाने खनन सुरू असते. त्यामुळे येथील वन्यजीवन धोक्यात आले आहे.खोदकामामुळे जंगलात अवजड वाहनांची संख्या वाढल्याने अपघातात बऱयाच वन्यजीवांचा बळीही जातो. त्यामुळे येथील सिंहांसोबत इतर प्राण्यांचे अस्तित्व धोक्यात येत आहे, असे ‘खम्मा गीर ने’ फाउंडेशनचे संस्थापक नरेंद्र मोजीद्रा यांनी सांगितले.