इंजेक्शनमधील 'तो' द्रव घातक नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 04:05 AM2021-06-22T04:05:59+5:302021-06-22T04:05:59+5:30
मुंबई: कांदिवलीच्या उच्चभ्रू सोसायटीमध्ये ३९० लोकांना बोगस लसीकरणादरम्यान देण्यात आलेला द्रव पदार्थ घातक नसल्याचे तपास अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. दरम्यान, ...
मुंबई: कांदिवलीच्या उच्चभ्रू सोसायटीमध्ये ३९० लोकांना बोगस लसीकरणादरम्यान देण्यात आलेला द्रव पदार्थ घातक नसल्याचे तपास अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. दरम्यान, याप्रकरणी मुख्य आरोपीचा शोध अद्याप सुरू असून पोलिसांनी ११४ प्रमाणपत्रे हस्तगत केली आहेत.
कांदिवली पोलिसांनी बोगस लसीकरण प्रकरणी महेंद्रसिंह याच्यासह पाच जणांच्या मुसक्या आवळल्या आहेत.
कांदिवलीतील हिरानंदानी हेरिटेज सोसायटीमध्ये ३० मे, २०२१ रोजी त्याने लसीकरण आयोजित केले होते. यादरम्यान नागरिकांना लसीच्या नावाखाली नेमके कोणते द्रव त्यांच्या शरीरात इंजेक्ट केले गेले याची दहशत अजूनही नागरिकांमध्ये आहे. याप्रकरणी एका वरिष्ठ तपास अधिकाऱ्याने ‘लोकमत’ला दिलेल्या माहितीनुसार, लसीकरणाला जवळपास २१ दिवस लोटले असून अद्याप तरी इंजेक्शन घेणाऱ्या एकाही व्यक्तीला कोणत्याच प्रकारचा त्रास जाणवलेला नाही. त्यानुसार त्यांना टोचण्यात आलेले द्रव हे घातक नसल्याची खात्री पोलिसांनी केली आहे.
मात्र, ते नेमके काय होते, याचा खुलासा सध्या फरार असलेला डॉक्टर मनीष त्रिपाठी याच्या अटकेनंतर होईल, असे पोलिसांचे म्हणणे आहे. त्याच्या टोळीने एकूण ९ ठिकाणी असे प्रकार केल्याचेही पोलिसांचे म्हणणे असून कांदिवलीत अवघ्या महिनाभराच्या नियोजनानंतर पहिला प्रकार करण्यात आला. खासगी रुग्णालयामध्ये लसीकरणाला बंदी घातल्यानंतर त्यांना याचा फायदा उचलला. त्याच्यामार्फत सिंह याने हिरानंदानी हेरिटेज सोसायटीतील सदस्यांना दिलेली ११४ प्रमाणपत्रे कांदिवली पोलिसांनी हस्तगत केली आहेत.