भाभा, शताब्दी रुग्णालयात सुविधा; पालिका प्रशासनाची माहिती
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : ऑक्सिजनच्या दैनंदिन पुरवठ्यावर गुगल ड्राइव्हच्या माध्यमातून देखरेख ठेवली जाणार असल्याचे महापौरांनी सांगितले आहे. पालिकेच्या भाभा, वांद्रे व कुर्ला आणि शताब्दी गोवंडी येथे बुधवारपासून लिक्विड ऑक्सिजन सुरू होईल, अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.
भाभा रुग्णालयात सोमवारी एका रुग्णाला ऑक्सिजनची खाट उपलब्ध न झाल्यामुळे मृत्यू ओढवल्याची घटना घडली होती. या पार्श्वभूमीवर माहिती देताना काकाणी यांनी सांगितले की, पालिकेच्या वतीने ऑक्सिजनचा साठा सुरळीत ठेवण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे. यापूर्वी तुटवड्याअभावी १६८ रुग्णांना सुरक्षित रुग्णालय, केंद्रात हलविण्यात आले होते. मात्र, भाभा रुग्णालयाबाहेर घडलेली घटना दुर्दैवी आहे, याविषयी चौकशी करण्यात येईल, असेही त्यांनी नमूद केले, तर भाभा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रदीप जाधव यांनी रुग्णाच्या कुटुंबीयांना ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत नसल्याचे कळविले होते, तसेच वाॅररूमशी संपर्क साधून अन्य ठिकाणी खाट उपलब्धतेच्या सूचना करण्यात आल्याचे सांगितले.