परळ डेपोच्या जिन्यावर दारूच्या बाटल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2025 13:18 IST2025-03-03T13:17:35+5:302025-03-03T13:18:09+5:30
स्वारगेट येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर लोकमतच्या प्रतिनिधीने या स्थानकाचा रात्रीच्या सुमारास आढावा घेतला.

परळ डेपोच्या जिन्यावर दारूच्या बाटल्या
अमर शैला, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : परळ एसटी डेपोच्या इमारतीच्या जिन्यावर दारूच्या बाटल्या पडल्याचा प्रकार समोर आला आहे, तसेच स्थानकाच्या परिसरात रात्रीच्या वेळी पार्किंग आणि अन्य ठिकाणी पुरेसा प्रकाश नसतो. तसेच या भागात पार्क केलेल्या काही साध्या गाड्यांचे दरवाजे उघडे असल्याचे चित्र होते.
स्वारगेट येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर लोकमतच्या प्रतिनिधीने या स्थानकाचा रात्रीच्या सुमारास आढावा घेतला. यामध्ये स्थानकातील स्वच्छतागृहाला लागून असलेल्या जिन्यावर दारूच्या बाटल्या पडल्याचे दिसून आले. हा जिना बंद अवस्थेत आहे.
... म्हणे हा कचरा
प्रशासनाकडे चौकशी केली असता, बाटल्या कचऱ्यातील असल्याचा दावा करण्यात आला. हा कचरा गोळा करून कर्मचाऱ्यांनी त्या ठिकाणी रात्री ठेवला होता. हा कचरा सकाळी फेकणार आहे, अशी माहिती आगारप्रमुख नितीन चव्हाण यांनी दिली. मात्र, अशा कचऱ्यामुळे दारुड्यांचा वावर येथे आहे का, अशी शंका व्यक्त होत आहे.
डेपोचा भार तीन सुरक्षारक्षकांवर?
परळ डेपोतून दरदिवशी जवळपास १२९ गाड्या स्थानकातून सुटतात, तर परळ डेपोतून दरदिवशी ८ हजार ते १० हजार प्रवासी प्रवास करतात. रात्री १२ वाजण्याच्या सुमारास शेवटची गाडी सुटते. सद्यस्थितीत या स्थानकाच्या सुरक्षेसाठी तीन सुरक्षारक्षक प्रत्येक पाळीत तैनात असतात, तसेच या स्थानकात बाहेरगावावरून २४ तास गाड्या येत असतात. त्यातून राज्याच्या कोनाकोपऱ्यातून प्रवासी प्रवास करून दाखल होतात.