मुंबईतील ७२७ पोलिसांची बदलीसाठी यादी तयार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 04:06 AM2021-06-30T04:06:16+5:302021-06-30T04:06:16+5:30
८ वर्षापेक्षा जास्त काळ एकाच ठिकाणी असलेल्या पोलिसांचा समावेश ८ वर्षांपेक्षा जास्त काळ एकाच ठिकाणी असलेल्या पोलिसांचा समावेश लोकमत ...
८ वर्षापेक्षा जास्त काळ एकाच ठिकाणी असलेल्या पोलिसांचा समावेश
८ वर्षांपेक्षा जास्त काळ एकाच ठिकाणी असलेल्या पोलिसांचा समावेश
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबई पोलीस दलात ८ वर्षांपेक्षा जास्त काळ ठाण मांडून असलेल्या ७२७ पोलिसांच्या बदलीची यादी तयार करण्यात आली आहे. पोलीस उपनिरीक्षक ते वरिष्ठ पोलीस निरीक्षकांचा यात समावेश आहे. उद्योगपती मुकेश अंबानी धमकी प्रकरण आणि ठाण्यातील व्यापारी मनसुख हिरेन हत्या प्रकरणात पोलीस अधिकारी सहभागी असल्याने पोलीस दलाची प्रतिमा मलिन झाली. यातील पोलीस अधिकाऱ्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले.
मुंबई पोलीस दलातही गुन्हे शाखेतील अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. अशात, एकाच दलात अनेक वर्षे ठाण मांडून असलेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचा निर्णय राज्य पोलीस मुख्यालयाने घेतला आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस दलात गेल्या आठ वर्षांपासून कर्तव्य बजावत असलेल्या पोलीस उपनिरीक्षक ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशा तब्बल ७२७ अधिकाऱ्यांची यादी तयार करण्यात आली असून, त्यांची मुंबईबाहेर बदली करण्यात येणार आहे. यात, १० पोलीस उपनिरीक्षक, ३७५ सहायक पोलीस निरीक्षक, २५३ पोलीस निरीक्षक आणि ९० वरिष्ठ पोलीस निरीक्षकांचा समावेश आहे. या अधिकाऱ्यांना त्यांच्या आवडीचे ३ जिल्हे निवडण्याची संधी देण्यात आली असून, त्या जिल्ह्यातील पदांच्या उपलब्धतेनुसार अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात येणार आहेत. त्यानुसार मंगळवारी यादी तयार करण्यात आली आहे.