लवकरच जाहीर होणार म्हाडाच्या धोकादायक सेस इमारतींची यादी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2019 02:15 AM2019-05-28T02:15:18+5:302019-05-28T02:15:28+5:30
म्हाडाच्या इमारत दुरुस्ती व पुनर्रचना विभागाकडून मुंबई शहरामध्ये असलेल्या सेस इमारतींचे दरवर्षी पावसाळापूर्व सर्वेक्षण करण्यात येते.
मुंबई : म्हाडाच्या इमारत दुरुस्ती व पुनर्रचना विभागाकडून मुंबई शहरामध्ये असलेल्या सेस इमारतींचे दरवर्षी पावसाळापूर्व सर्वेक्षण करण्यात येते. यंदा म्हाडाच्या बहुतांश अधिकाऱ्यांची निवडणुकीच्या कामानिमित्त नियुक्ती झाली असल्याने हे काम लांबणीवर पडले होते. मात्र आता हे काम अंतिम टप्प्यामध्ये आले असून लवकरच मुंबईतील धोकादायक आणि अतिधोकादायक इमारतींची यादी जाहीर करण्यात येणार असल्याचे म्हाडाच्या वरिष्ठ अधिकाºयाने सांगितले.
दरवर्षी म्हाडाकडून सेस इमारतींचे सर्वेक्षण करण्यात येते. यानंतर अतिधोकादायक ठरणाºया इमारतींमधील रहिवाशांना संक्रमण शिबिरांमध्ये तात्पुरते स्थलांतरित करण्यात येते. यानंतर इमारतीची दुरुस्ती करण्यात येते. या प्रक्रियेला वेळ लागतो. यंदा जून महिना सुरू व्हायला थोडेच दिवस शिल्लक असतानाही अद्याप यादी जाहीर न झाल्याने यंदाची ही प्रक्रिया लांबणीवर पडण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. मुंबईमध्ये १४ हजार २८६ सेस इमारती आहेत. या इमारतींचे सर्वेक्षण करून त्याप्रमाणे त्यांची वर्गवारी करण्यात येत आहे. गेल्या वर्षी आठ इमारतींचा समावेश अतिधोकादायक इमारतींमध्ये करण्यात आला होता. आता ही प्रक्रिया अंतिम टप्प्यामध्ये आली असून लवकरच अतिधोकादायक इमारतींची घोषणा म्हाडातर्फे केली जाणार आहे.
धोकादायक इमारती जाहीर करण्यासाठी पालिकेने मार्गदर्शक धोरण आखले आहे. त्यानुसार इमारती अतिधोकादायक, धोकादायक तसेच दुरुस्ती करणे आदी प्रकारच्या प्रवर्गानुसार इमारतींची यादी जाहीर केली जाते. गेल्या वर्षी घेण्यात आलेल्या आढाव्यानुसार ज्या इमारती धोकादायक ठरल्या होत्या त्यातील काही इमारती तोडण्यात आल्या, तर काही रिकाम्या करण्यात आल्या तसेच काही इमारतींना न्यायालयाच्या आदेशानुसार स्थगिती देण्यात आली. काही इमारतींची वीज जोडणी आणि पाणीपुरवठा खंडित करण्यात आला, मात्र यंदा हे सर्वेक्षणाचे काम निवडणुकीच्या कामामुळे लांबल्याने पावसाळा सुरू झाल्यास धोकादायक इमारतींचा प्रश्न निर्माण होईल, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.
>अहवालातून धक्कादायक माहिती
नुकताच मुंबईतील अतिधोकादायक इमारतींचा अहवाल तयार करण्यात आला होता. यामध्ये १९७० ते २०१८ या कालावधीत पावसाळ्यात इमारती कोसळून सेस इमारतींच्या पडझडींच्या घटनांमध्ये ८९४ नागरिकांनी जीव गमावला असून, १ हजार ८८३ नागरिक जखमी झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
>घर सोडण्यास रहिवासी देतात नकार
ऐन पावसाळ्यात उपकरप्राप्त जीर्ण इमारती कोसळण्याच्या घटना घडतात. यामुळे रहिवाशांना अनेकदा आपत्तीजन्य परिस्थितीला सामोरे जावे लागते. रहिवाशांचा त्रास कमी व्हावा आणि जीवितहानी होऊ नये यासाठी म्हाडा दुरुस्ती मंडळाकडून दरवर्षी आवाहन करण्यात येते. मात्र आपल्याला वर्षानुवर्षे संक्रमण शिबिरांमध्ये खितपत पडावे लागेल, या भीतीने रहिवासी जागा खाली करण्यास नकार देतात.
कामाठीपुरा येथील १२५ इमारतींना टेकू
मुंबई शहरात सर्वाधिक जुन्या आणि धोकादायक इमारती कामाठीपुरा परिसरामध्ये आहेत. कामाठीपुरा येथे ५३० उपकरप्राप्त इमारती असून बहुतेक इमारती १०० वर्षे जुन्या आहेत. त्यापैकी १२५ इमारतींना टेकूचा आधार आहे, अशी माहिती म्हाडाने अहवालात दिली आहे. त्यामुळे तेथील रहिवाशांना जीव मुठीत घेऊन राहावे लागते. जुन्या आणि जीर्ण झालेल्या या इमारतींचा लवकरच मेकओव्हर होणार आहे.