Join us  

धारावी सेक्टर पाचमधील प्रारूप यादी जाहीर

By admin | Published: October 23, 2015 3:18 AM

धारावी पुनर्वसन प्रकल्पाच्या सेक्टर ५ चा पुनर्विकास म्हाडाच्या मुंबई मंडळामार्फत करण्यात येत आहे. या प्रकल्पातील क्लस्टर जे मधील झोपडीधारकांची पात्र-अपात्रतेची प्रारूप यादी

- तेजस वाघमारे,  मुंबईधारावी पुनर्वसन प्रकल्पाच्या सेक्टर ५ चा पुनर्विकास म्हाडाच्या मुंबई मंडळामार्फत करण्यात येत आहे. या प्रकल्पातील क्लस्टर जे मधील झोपडीधारकांची पात्र-अपात्रतेची प्रारूप यादी जाहीर करण्यात आली आहे. ५२४ झोपडीधारकांच्या प्रारूप यादीत २३३ झोपडीधारक अपात्र ठरले असून ६४ झोपडीधारकांच्या पात्रतेचा निर्णय प्रलंबित ठेवण्यात आला आहे. या झोपडीधारकांना १0 नोव्हेंबरपर्यंत म्हाडाकडे हरकती, आक्षेप नोंदवता येणार आहेत.धारावीच्या पुनर्विकासासाठी राज्य शासनाने धारावी पुनर्विकास प्राधिकरणाची स्थापना केली आहे. प्राधिकरणामार्फत सेक्टर १ ते ४ चा पुनर्विकास करण्यात येणार आहे. तर सेक्टर ५ च्या पुनर्विकासाचे काम म्हाडाकडे सोपविण्यात आले आहे. त्यानुसार म्हाडाने क्लस्टर जे मधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर शताब्दी नगरातील झोपडीधारकांची पात्र, अपात्रतेची प्रारूप यादी जाहीर केली आहे. ५२४ झोपडीधारकांच्या पात्र, अपात्रतेच्या प्रारूप यादीत २३३ झोपडीधारकांनी आवश्यक कागदपत्रे सादर न केल्याने म्हाडाने त्यांना अपात्र ठरवले आहे. तर विविध कागदपत्रांची पूर्तता न केल्याने ६४ झोपडीधारकांच्या पात्र-अपात्रतेचा निर्णय प्रलंबित ठेवण्यात आला आहे. ५२४ झोपडीधारकांची प्रारूप यादी म्हाडाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. ही यादी डॉ. बाबासाहेब आंबेडकर शताब्दी नगर, धारावी येथील वसाहतीत दर्शनीय भागात लावण्यात येणार आहे. तसेच साई मित्र मंडळाच्या आवारातही ही यादी प्रसिद्ध करण्यात येईल. त्याचप्रमाणे म्हाडाच्या पाचव्या मजल्यावरील सूचना फलकावरही ही यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप यादीमध्ये अनेक झोपडीधारकांना विविध कागदपत्रांची पूर्तता केली नसल्याने अपात्र ठरविण्यात आले आहे. या यादीबाबत झोपडीधारकांना काही आक्षेप असल्यास त्यांनी अर्ज आणि पुराव्यासह म्हाडा मुख्यालय कक्ष क्रमांक १९ तळमजला येथे संपर्क साधावा, असे आवाहन म्हाडाने केले आहे. झोपडीधारकांना १0 नोव्हेंबरपर्यंत आपल्या हरकती प्रत्यक्ष आणि टपालाद्वारे पाठविता येणार आहेत. झोपडीधारकांनी नोंदविलेल्या आक्षेपांच्या कागदपत्रांची तपासणी केल्यानंतर त्यांची सुनावणी घेऊन अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात येईल.दिवाळीत ताबा ?धारावीकरांचा विरोध डावलून म्हाडाने सेक्टर ५ मध्ये एक इमारत उभारली आहे. गेल्या कित्येक महिन्यांपासून ‘क्लस्टर जे’मधील झोपडीधारकांच्या पात्रतेची प्रारूप यादी रखडली होती. ही यादी म्हाडाने जाहीर केली असून झोपडीधारकांच्या हरकतींनंतर अंतिम यादी नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात जाहीर करून येथील झोपडीधारकांना नवीन इमारतीतील घरांचा ताबा देण्यासाठी म्हाडा अधिकाऱ्यांनी हालचाली सुरू केल्या आहेत.