Join us

मुख्यमंत्री कार्यालयातील अधिकाऱ्यांची महत्त्वाच्या विभागांमध्ये वर्णी; सामान्य प्रशासन विभागाचे बदल्यांचे आदेश जारी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2024 2:58 PM

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रालयातील  कार्यालयात सहसचिव म्हणून कार्यरत राहून गृह विभाग सांभाळणारे व्यंकटेश भट यांनी आपली  बदली उद्योग, ऊर्जा विभागात करून घेतली आहे. याशिवाय मुख्यमंत्री कार्यालयातील आणखी एक सहसचिव कैलास बिलोणीकर यांची बदली जलसंपदा विभागात झाली आहे.

मुंबई : विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याच्या आदल्या दिवशी  मुख्यमंत्री कार्यालयातील तसेच मंत्री आस्थापनेवरील अधिकाऱ्यांनी आपली वर्णी मंत्रालयात महत्त्वाच्या विभागात लावून घेतली  आहे. सामान्य प्रशासन विभागाने सोमवारी या अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रालयातील  कार्यालयात सहसचिव म्हणून कार्यरत राहून गृह विभाग सांभाळणारे व्यंकटेश भट यांनी आपली  बदली उद्योग, ऊर्जा विभागात करून घेतली आहे. याशिवाय मुख्यमंत्री कार्यालयातील आणखी एक सहसचिव कैलास बिलोणीकर यांची बदली जलसंपदा विभागात झाली आहे. शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांचे खासगी सचिव मंगेश शिंदे यांनी आपली वर्णी सहसचिव शालेय शिक्षण, क्रीडा  विभागात लावून घेतली आहे.मुख्यमंत्री कार्यालयातील उपसचिव सचिन सहस्रबुद्धे, चंद्रशेखर तरंगे, मनोजकुमार महाले यांची बदली अनुक्रमे ग्रामविकास, गृहनिर्माण, महसूल आणि वन विभागात झाली आहे. याशिवाय मुख्यमंत्री कार्यालयात प्रतिनियुक्तीवर रुजू झालेले अवर सचिव  सुधीर शास्त्री यांची  सेवा नगरविकास विभागात, धीरज अभंग यांची गृहनिर्माण विभागात, नीलेश पोतदार यांची पर्यावरण आणि वातावरणीय बदल विभागात, प्रवीण पाटील यांची महसूल आणि वन विभाग तर वृषाली नवाथे यांची वित्त विभागात प्रत्यावर्तीत करण्यात आली आहे. 

साडेतीन महिन्यांपासून रोखल्या बदल्या अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री, मंत्री कार्यालयातील आपले बस्तान हलविले आहे. दरम्यान, मंत्र्यांच्या विरोधामुळे साडेतीन महिन्यांपासून रोखून धरण्यात आलेल्या सहसचिव, उपसचिव दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.बदल्या कुठे होतील?नोव्हेंबरमध्ये कोणाचे सरकार येईल आणि नंतर आपल्या बदल्या कुठे होतील याची खात्री नसली, की अशा बदल्या करून घेतल्या जातात. अशाच बदल्या पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री म्हणून निवडणुकीला सामोरे जाताना अनेक अधिकाऱ्यांनी करून घेतल्या होत्या.