मुंबई : म्हाडाच्या या वर्षी घराच्या लॉटरीमध्ये अयशस्वी ठरलेल्यांपैकी ‘रिफंड’ जमा न झालेल्या १९००वर अर्जदारांची नावे प्राधिकरणाने संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहेत. खात्यावर पैसे जमा न होण्याची कारणे त्यामध्ये नमूद करण्यात आली असून रक्कम परत मिळण्यासाठी पुन्हा नव्याने अर्ज करावा लागणार आहे.म्हाडाने मुंबई व विरार-बोळिंज आणि वेंग्युर्ल्यामध्ये बांधलेल्या २६४१ सदनिकांची २६ जूनला संगणकीय सोडत काढण्यात आली. त्यामध्ये अयशस्वी ठरलेल्या ९१ हजारांवर अर्जदारांची अनामत रक्कम टप्प्याटप्प्याने परत करण्यात आली आहे. मात्र अद्याप २६०३ जणांची रक्कम म्हाडाकडे राहिली आहे. त्यापैकी १९०० जणांनी चुकीचा बॅँक खाते क्रमांक, नाव किंवा एका नंबरवर एकापेक्षा जास्त अर्ज भरले आहेत. तर ७०३ जणांनी बॅँकेचा चुकीचा आयकर नंबर भरल्याने पैसे मिळालेले नाहीत. त्याची शहानिशा करून पुन्हा रक्कम खात्यावर जमा केली जाणार आहे. त्यासाठी अर्जदारांकडून पुन्हा नव्याने अर्ज, बॅँकेच्या अद्ययावत व्यवहाराची प्रत म्हाडाच्या कार्यालयात जमा करावी लागणार आहे. त्यानंतर आठवडाभरात त्यांची रक्कम खात्यावर वर्ग केली जाईल, असे पणन विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले. या वर्षी लॉटरीसाठी एकूण ९३ हजार १३० अर्ज आले होते. (प्रतिनिधी)
रिफंड न मिळालेल्यांची यादी साइटवर
By admin | Published: July 18, 2014 1:04 AM