संभाजी ब्रिगेडच्या उमेदवारांची यादी जाहीर
By admin | Published: January 29, 2017 03:39 AM2017-01-29T03:39:41+5:302017-01-29T03:39:41+5:30
मुंबई महापालिका निवडणुकांची लगबग सर्वच पक्षांमध्ये सुरू झाली आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत सुरू झाली असून, राजकीय पक्ष उमेदवारांच्या याद्या जाहीर करत आहेत.
मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकांची लगबग सर्वच पक्षांमध्ये सुरू झाली आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत सुरू झाली असून, राजकीय पक्ष उमेदवारांच्या याद्या जाहीर करत आहेत. शनिवारी संभाजी ब्रिगेडने पहिल्या २० उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. येत्या दोन दिवसांत अन्य उमेदवारांचीदेखील यादी जाहीर करणार असल्याचे या पक्षाच्या वतीने सांगण्यात आले.
दोन महिन्यांपूर्वी राजकीय पक्षात पदार्पण केलेल्या संभाजी ब्रिगेडने मुंबई महानगरपालिकेच्या सर्व २२७ जागा लढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, ब्रिगेडने शनिवारी पहिली उमेदवारांची यादी जाहीर केली.
एकूण साडेतीनशे उमेदवारांच्या मुलाखाती घेतल्यानंतर, पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. संभाजी ब्रिगेडचे मुंबई विभागाचे प्रचार प्रमुख संतोष परब, मुंबई अध्यक्ष अमोल जाधवराव, मुंबई कार्याध्यक्ष अजय यादव यांच्या मार्गदर्शनाखाली इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती
घेण्यात आल्या होत्या. यातून २० उमेदवारांची यादी तयार करण्यात आली.
पुढील यादी दोन ते तीन दिवसांत घोषित करण्यात येणार आहे. त्याचबरोबर, रविवार २९ पासून कुलाबा विभागात भव्य रॅली काढून प्रचाराला सुरुवातदेखील करणार असल्याची माहिती प्रचारप्रमुखांनी दिली. (प्रतिनिधी)