तुमचं ऐकलं, आता आमचं ऐका, 'किंबहुना ऐकाच'...; मनसेचंही फेसबुक लाईव्ह
By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2021 09:16 AM2021-04-03T09:16:53+5:302021-04-03T09:18:06+5:30
''मुख्यमंत्री साहेब, तुमचं ऐकलं, आता आमचं ऐका...किंबुहना ऐकाच ! उद्या सकाळी 11 वाजता फेसबुक लाईव्ह.'', असे ट्विट देशपांडे यांनी केलंय.
मुंबई - राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. राज्यात लॉकडाऊनला विरोध करणाऱ्या आणि लॉकडाऊन केलं तर रस्त्यावर उतरण्याचा इशारा देणाऱ्यांवर निशाणा साधत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जगातील परिस्थितीची आढावा वाचून दाखवला. आपल्या भाषणात मुख्यमंत्र्यांनी अनेकांचा खरपूस समाचार घेतला. अर्थमंत्र्यांपासून ते उद्योजक आनंद महिंद्रांनाही त्यांनी लक्ष्य केलं. विशेष म्हणजे मास्क न वापरण्यात कसलं शौर्य? असेही ते म्हणाले. मुख्यमंत्र्यांच्या या लाईव्हनंतर आता मनसेही लाईव्हच्या माध्यमातून उत्तर देणार आहे.
मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन मुख्यमंत्र्यांच्या लाईव्हची एकप्रकारे खिल्लीच उडवली आहे. ''मुख्यमंत्री साहेब, तुमचं ऐकलं, आता आमचं ऐका...किंबुहना ऐकाच ! उद्या सकाळी 11 वाजता फेसबुक लाईव्ह.'', असे ट्विट देशपांडे यांनी केलंय. म्हणजे, मुख्यमंत्र्यांच्या भाषेचा आपल्या ट्विटमध्ये उल्लेख करत, त्यांनी 11 वाजता फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून उत्तर देणार असल्याचं सूचवलं आहे.
मुख्यमंत्री साहेब, तुमचं ऐकलं, आता आमचं ऐका...किंबुहना ऐकाच ! उद्या सकाळी 11 वाजता फेस बुक लाईव्ह.
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) April 2, 2021
Sandeep Deshpande Adhikrut
या फेसबुक पेजवर
मास्क न वापरणाऱ्यांना टोला
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मी मास्क घालत नाही, असे जाहीरपणे सांगितले होते. त्यावरुन, मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात नाव न घेता टोला लगावला. अनेकजणांना असं वाटतंय, ये मास्क का लावतोय तू. पण, मास्क न लावण्यात शौर्य काय, मी मास्क वापरणा नाही, मग काय शूर आहेस का? असा प्रश्न विचारत खोचक टोला मुख्यमंत्र्यांनी कुणाचेही नाव न घेता लगावला. मास्क न लावणे यात शूरता नाही, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.
काय म्हणाले मुख्यमंत्री
ब्राझील, फ्रान्स, बल्गेरिया, रशिया मधल्या परिस्थितीची माहिती मुख्यमंत्र्यांनी देत तिथं लादण्यात आलेल्या कठोर निर्बंध आणि लॉकडाऊनबाबत सांगून विरोधकांवर निशाणा साधला. "देशाबाहेर कोरोनाची स्थिती भयंकर होत चालली आहे. अनेक ठिकाणी आजही लॉकडाऊन आणि कडक निर्बंध लादलेले आहेत. पण, आपण राज्यातील जनतेचा आणि त्यांच्या उदरनिर्वाहाचा विचार करुन अद्याप तरी लॉकडाऊन केलेला नाही. त्यामुळे विरोधकांनी कोरोनाचं राजकारण करू नये. उलट त्यांनी राज्य सरकार घेत असलेल्या निर्णयांसाठी मदत करण्याची भूमिका घ्यावी", असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं आहे.
लॉकडाऊन नको मग पर्याय सुचवा
"राज्यात आपण आरोग्य सुविधा वाढवत आहोत. आजच्या घडीला सर्वाधिक चाचण्या महाराष्ट्रात होत आहेत आणि संख्या येत्याही काळात वाढवण्यात येणार आहे. पण आरोग्य सेवा वाढवा म्हणजे फक्त फर्निचर वाढवून चालत नाही. त्यासाठी लागणारे डॉक्टर, नर्सेस आणि तज्ज्ञ मंडळी कुठून आणणार?", असा सवाल मुख्यमंत्र्यांनी यावेळी उपस्थित केला.
दोन दिवसांत कठोर नियमावली जाहीर करणार
मुख्यमंत्र्यांनी यावेळी संपूर्ण लॉकडाऊन जाहीर करत नसलो तरी इशारा देत आहे, असं सांगत येत्या दोन दिवसांत राज्यात नव्या निर्बंधांची नियमावली जाहीर करण्यात येईल, अशी माहिती दिली आहे. तसेच अशीच रुग्णवाढ सुरू राहिली तर येत्या १०-१५ दिवसांत राज्यातील उपलब्ध आरोग्य संसाधनं कमी पडू लागतील आणि कठोर निर्णय घ्यावा लागेल, असा थेट निर्वाणीचा इशारा देखील मुख्यमंत्र्यांनी दिला आहे
लॉकडाऊनबाबत काँग्रेसची भूमिका
मुख्यमंत्र्यांच्या संबोधनानंतर त्यांनी दिलेल्या लॉकडाऊनच्या इशाऱ्यााबाबत काँग्रेसचे मुंबई प्रदेशाध्यक्ष भाई जगताप यांना विचारले असता त्यांनी पुन्हा एकदा सरसकट लॉकडाऊन परवडणारा नसल्याचे विधान केले. भाई जगताप म्हणाले की, मला असं वाटतं की कोरोनाचे आकडे वाढत आहेत त्याची चिंता तुम्हा आम्हा सर्वांनाच आहे. स्वाभाविकपणे राज्याचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्र्यांनाही ती चिंता आहे. परंतु लॉकडाऊनबाबत याआधीही आम्ही आमची भूमिका स्पष्ट केलेली आहे. पूर्ण लॉकडाऊन न करता आता जो काही नाईट कर्फ्यू आहे त्यामध्ये परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन अधिक काय करता येईल याचा विचार व्हायला हवा, असे भाई जगताप यांनी सांगितले.