मुंबई - शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे मंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (NCP Supriya Sule) यांच्यावर आक्षेपार्ह भाषेत टीका केल्याचे समोर आले. त्यानंतर राज्यभरात राष्ट्रवादी काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी अब्दुल सत्तार यांच्यावर पन्नास खोकेवरुन टीका केली होती, या टीकेला प्रत्युत्तर देताना मंत्री अब्दुल सत्तार यांनी शिवी दिली. यावरुन राज्यात सत्तार यांच्यावर टिकेची झोड उठल्यानंतर शिंदे गटानेही हे विधान चुकीचं असल्याचं म्हटलं आहे. मात्र, त्यासोबतच महाविकास आघाडीतील नेत्यांना इशाराही दिला आहे.
शिंदे गटाच्या नेत्यांवर होत असलेल्या ५० खोक्यांच्या टिकेवरुन बोलताना सुप्रिया सुळेंनी शिंदे गटातील नेत्यांना एकप्रकारे सल्लाच दिला होता. माझ्याबाबत असा प्रकार घडला असता तर मी गुन्हा दाखल केला असता, न्यायालयात गेले असते, असे सुळे यांनी म्हटले. त्यानंतर, आम्ही सुप्रिया सुळेंचा सल्ला ऐकला आहे. त्यानुसार अजित पवार, सुप्रिया सुळे आणि आदित्य ठाकरे यांनी वारंवार ५० खोके घेतल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे, शिवसेनेचे ४० आमदार आणि १० अपक्ष आमदार अशा एकूण ५० आमदारांच्यावतीने या तिन्ही नेत्यांविरुद्ध बदनामीचा खटला दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाल्याचे शिंदे गटाचे प्रवक्ते विजय शिवतारे यांनी म्हटले आहे.
२५०० कोटींचा अब्रु नुकसानीचा दावा
या तिन्ही नेत्यांनी एकतर नेत्यांची बदनामी केली म्हणून जाहीरपणे माफी मागावी अन्यथा बदनामीच्या खटल्याला कायदेशीर मार्गाने सामोरे जावे, असा इशाराच शिंदे गटाकडून देण्यात आला आहे. शिंदे गटाचे प्रवक्ते विजय शिवतारे यांनी पत्रकार परिषद घेऊन शिंदे गटाची अधिकृत भूमिका जाहीर केली. अब्दुल सत्तार यांनी केलेल्या विधानाचं कोणीही समर्थन करणार नाही. त्यांच्याकडून झालेलं विधान हे चुकीचं आहे. मात्र, हे विधान त्यांच्या तोंडून का बाहेर आलं याचाही विचार व्हायला हवा. वारंवार ५० खोके घेतल्याचा आरोप करत बदनामी करण्याचा प्रयत्न होत आहे. त्यातूनच संयम सुटल्यानेच अब्दुल सत्तार यांचे स्लीप ऑफ टंग झाले, असे विजय शिवतारे यांनी म्हटले. तसेच, अजित पवार, सुप्रिया सुळे आणि आदित्य ठाकरे यांनी अशी बदनामी केल्यामुळे, त्यांनी कोर्टात ५० खोके घेतल्याचे पुरावे सादर करावेत. अन्यथा २५०० कोटींच्या अब्रु नुकसानीच्या दाव्याच्या नोटीसा दिल्या जातील, असे शिवतारे यांनी स्पष्ट केले.