मनोहर कुंभेजकर / मुंबईमहापालिकेत भाजपाचे नगरसेवक पारदर्शी आणि नागरिकांच्या हिताच्या कामांना प्राधान्य देतील, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपा मुंबई अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी पालिका निवडणूकीपूर्वी आपल्या प्रचार सभांमधून दिली होती. त्याची प्रचिती के/पश्चिम विभागातील प्रभाग समितीच्या बैठकीत आली. के/पश्चिम विभागातील फेरीवाल्यांच्या विरोधात कारवाई करण्यात येत नसल्याच्या निषेधार्थ, भाजपा नगरसेवकांनी प्रभाग समिती बैठकीतून सभात्याग केला. भाजपा आणि काँग्रेस नगरसेवकांमध्ये या वेळी जोरदार शाब्दिक चकमक उडाली. या बैठकीला पालिका उपायुक्त किरण आचरेकर आणि के/पश्चिम विभागाचे सहायक पालिका आयुक्त प्रशांत गायकवाड उपस्थित होते. मात्र, त्यांच्याशी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, ते उपलब्ध झाले नाहीत. पदपथावर चालणे हा नागरिकांचा अधिकार असताना, के/पश्चिम विभागातील पदपथांवर मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करून, सर्रास फेरीवाल्यांकडून बनविण्यात येणारे खाद्यपदार्थ, तसेच पथपथांवर होणारे फेरीवाल्यांचे वाढते अतिक्रमण आणि वाढती अनाधिकृत बांधकामे यावर पालिकेच्या के/पश्चिम विभागाच्या प्रशासनाकडून कारवाई का होत नाही? असा थेट सवाल भाजपाचे प्रभाग क्रमांक ६८ चे रोहन राठोड यांनी पालिका प्रशासनाला एका पत्राद्वारे विचारला होता आणि या बैठकीला गैरहजर राहण्याचे जाहीर केले होते. भाजपा प्रभाग क्रमांक ७१ चे नगरसेवक अनिष मकवानी यांनी सदर बैठक रद्द करण्याचे पत्र सहायक पालिका आयुक्त प्रशांत गायकवाड यांना दिले. प्रभाग समिती अध्यक्ष योगीराज दाभाडकर यांच्या अध्यक्षतेखाली प्रभाग समितीची बैठक सुरू झाली. मकवानी यांच्या बैठक रद्द करण्याचा मागणीला भाजपाच्या उपस्थित नगरसेवकांनी जोरदार पाठिंबा दिला. येथील भाजपा नगरसेवक अनिष मकवानी, रेणू हंसराज आणि काँग्रेसचे नगरसेविका अल्पिता जाधव, मिहीर हैदर यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक झाली. पदपथावर अन्न शिजवणे कोणत्या कायद्यामध्ये बसते ?फेरीवाल्यांचा उदरनिर्वाह हा त्यांच्या व्यवसायावर अवलंबून असतो, अशी भूमिका मांडून फेरीवाले आणि अतिक्रमण समर्थनीय असल्याची भूमिका काँग्रेस नगरसेवकांनी मांडली, तर पदपथावर अन्न शिजवणे आणि अतिक्रमण कोणत्या कायद्यात बसते? असा थेट सवाल भाजपा नगरसेवकांनी केला. अखेर नगरसेवक अनिष मकवानी यांनी प्रभाग समितीची बैठक रद्द करण्याची नोटीस पालिका प्रशासनाला दिली. अनिष मकवानी यांच्यासह नगरसेविका रेणू हंसराज, सुधा सिंग, सुनीता मेहता, रजना पाटील यांनी सभात्याग केला.
भाजपा आणि काँग्रेस नगरसेवकांमध्ये शाब्दिक चकमक
By admin | Published: May 03, 2017 6:25 AM