लेखकांचे कौतुक करून त्यांच्यातल्या लेखनाला ऊर्जा मिळवून देणारा साहित्यिक हरपला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2017 12:25 AM2017-09-03T00:25:39+5:302017-09-03T00:25:43+5:30

शिरीष पै यांचे साहित्य मी नेहमीच वाचत आलो आहे, मात्र गेली पाच वर्षे मी त्यांच्या प्रत्यक्ष संपर्कात आलो. त्यांच्या साहित्याची लांबी-रुंदी मला माहीत होती, पण त्यांच्या सहवासात त्या साहित्याची खोली किती आहे हे समजले.

A literary challenge giving the writer the power to praise his writings | लेखकांचे कौतुक करून त्यांच्यातल्या लेखनाला ऊर्जा मिळवून देणारा साहित्यिक हरपला

लेखकांचे कौतुक करून त्यांच्यातल्या लेखनाला ऊर्जा मिळवून देणारा साहित्यिक हरपला

Next

- अशोक हांडे ।

शिरीष पै यांचे साहित्य मी नेहमीच वाचत आलो आहे, मात्र गेली पाच वर्षे मी त्यांच्या प्रत्यक्ष संपर्कात आलो. त्यांच्या साहित्याची लांबी-रुंदी मला माहीत होती, पण त्यांच्या सहवासात त्या साहित्याची खोली किती आहे हे समजले. त्यांचे बोलणे आणि त्यांनी सांगितलेले किस्से यातून आचार्य अत्रे यांच्याविषयीची मोठी माहिती मिळत गेली. त्यातूनच मी ‘अत्रे अत्रे सर्वत्र’ हा महाप्रचंड कार्यक्रम उभा करू शकलो.
आचार्य अत्रे यांचे जीवन अडीच तासांच्या वेळेत बसवणे हे कठीण काम आहे, मात्र शिरीषताईंनी पुरवलेल्या माहितीमुळे मी हा कार्यक्रम करू शकलो. त्यांनी नाटक, कविता, हायकू, कादंब-या असे अनेक साहित्यप्रकार हाताळले. जीवनाविषयी त्यांचा दृष्टिकोन कायम सकारात्मक होता. जीवनासारखी दुसरी सुंदर गोष्ट नाही, असे आचार्य अत्रे त्यांना म्हणायचे; याची त्या आठवण करून द्यायच्या. त्या सतत आचार्य अत्रे यांच्या आठवणींत रममाण झालेल्या असायच्या. त्यांचा सगळा जीवनक्रम आचार्य अत्रे यांचे साहित्य, त्यांचे कर्तृत्व, त्यांचे नेतृत्व याभोवतीच फिरत असायचा. आचार्य अत्रे यांची एखादी कलाकृती किंवा त्याविषयीचा संवाद सुरू झाला की त्यांना जोर चढायचा. त्यांना व्यवस्थित बसता येत नसतानाही केवळ आचार्य अत्रे यांच्यावर माझा कार्यक्रम असल्याने त्या अडीच तास बसायच्या. त्यांच्या संपूर्ण आयुष्याने त्यांनी पुढच्या पिढीतील कवी, लेखक यांच्यापुढे आदर्श निर्माण केला. त्यांनी विविध प्रकारच्या लेखकांचे साहित्य मोठ्या प्रमाणावर छापले. ललित साहित्यातले अनेक जण केवळ शिरीषतार्इंमुळे मोठे झाले आहेत. पण याचे श्रेय त्यांनी त्या त्या लेखकालाच कायम दिले. १९६९ पासून १९७६ पर्यंत अगदी कर्जबाजारी होईपर्यंत त्यांनी ‘मराठा’ चालवला. स्वत:चा सगळा संसार त्यांनी वेठीला धरला. त्यातून बरेच काही गमावले. परंतु त्यांनी हार मानली नाही. हे सगळे त्यांनी पचवले. या सगळ्यातून बाहेर पडून त्या पुन्हा स्वत:च्या काव्य-साहित्याकडे वळल्या. नवनवीन लेखकांचे कौतुक करून त्यांच्यातल्या लेखनाला ऊर्जा मिळवून देण्याचे कार्य त्या अखेरपर्यंत करत राहिल्या.

(शब्दांकन : राज चिंचणकर)

Web Title: A literary challenge giving the writer the power to praise his writings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई