Join us  

संत-विभूतींचे व्यक्तिमत्त्व लाभलेले साहित्यिक फादर फ्रान्सिस दिब्रिटो

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2024 10:04 AM

डॉ. पांडुरंग फळदेसाई, संचालक, थॉमस स्टिफन्स कोकणी केंद्र, गोवा

जाण आणि सजग धार्मिक भान असलेले व्यासंगी साहित्यिक फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या निधनाचे दु:खद वृत्त कानावर आले आणि एक अनामिक अस्वस्थता मनाला व्यापून राहिली. फादर दिब्रिटो यांना मी कला अकादमीत असताना कला अकादमीच्या साहित्य पुरस्कार प्रदान समारंभात प्रथमतः पाहिले होते आणि त्यांच्या निर्मळ अंत:करणाची साक्ष देणारे त्यांचे प्रमुख पाहुणे म्हणून भाषण मी पहिल्यांदा ऐकले होते. एखाद्या संत पुरुषाची अमृतवाणी ऐकावी तशी अनुभूती मला त्यावेळी आली होती.

शांत, संयमी परंतु दृढ आत्मविश्वासाने परिपूर्ण असे त्यांचे व्यक्तिमत्त्व म्हणजे त्यांनी जीवनकार्य म्हणून स्वीकारलेल्या ख्रिस्ती धर्मोपदेशकाला शोभण्यासारखेच होते. त्यांनी धर्म, आचरण आणि सामाजिक भान ही त्रिसूत्री आदर्श मानली. धर्मा-धर्मात संवाद हवा ही फादर दिब्रिटोंची सुरुवातीपासूनची भूमिका अनेकांना भावली.

फादर पेशाने ख्रिस्ती धर्मगुरू असल्याने ख्रिस्ती धर्मपरंपरेचा सखोल अभ्यास करणे हे त्यांनी आपले परम कर्तव्य मानले. आपला अभ्यास ग्रंथरूपाने प्रसिद्ध झाल्यास तो अधिकाधिक वाचकांपर्यंत जाईल हे जाणून त्यांनी ख्रिस्त आणि येशू ख्रिस्तांचा धर्म या विषयांवर सुबोध साहित्य निर्माण केले. महाराष्ट्राच्या भूमीत जन्मलेल्या या ख्रिस्ती भक्ताने माय मराठीची जाणीवपूर्वक सेवा केली. मदर तेरेसांचे अंतरंग उलगडून दाखविणारे त्यांनी लिहिलेले ‘आनंदाचे अंतरंग’ हे पुस्तक उल्लेखनीय आहे. त्यांच्या लेखणीतून साकारलेल्या ‘सुबोध बायबल - नवा करार’ या त्यांच्या ग्रंथाला साहित्य अकादमीचा २०१३ वर्षाचा अनुवादाचा साहित्य पुरस्कार देण्यात आला आहे.

फादर दिब्रिटो यांची ‘संघर्षयात्रा ख्रिस्तभूमीची’ हा संशोधनपर ग्रंथ लिहून मराठी ख्रिस्ती साहित्यात मोलाची भर घातली आहे. आपले संशोधन परिपूर्ण व्हावे आणि आपल्या लेखनाला अस्सल अनुभूतीचे स्वरूप यावे यासाठी फादर दिब्रिटोंनी इस्रायलमध्ये वास्तव्य केले आणि प्रत्यक्ष स्वरूपात क्षेत्रीय संशोधन करून आपले ग्रंथलेखन केले. दिब्रिटो यांच्या साहित्यिक जीवनाच्या वाटचालीत त्यांच्या संपादकत्वाखाली निघणाऱ्या ‘सुवार्ता’ मासिकाचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. 

आपल्या भूमीवर आलेली संकटे आणि अस्तित्वाचा प्रश्न निर्माण करणाऱ्या घटनांनी ते मनोमन अस्वस्थ होत. फादर दिब्रिटोंच्या संवेदनशील मनाने त्यांना अंतर्बाह्य हेलावून सोडले. त्यातूनच त्यांनी पर्यावरण नाशाला प्रखर विरोध केला. गुंडगिरीचे राजकारणाविरुद्ध त्यांनी यशस्वी लढा दिला. त्यांची साहित्यसेवा ध्यानात घेऊन त्यांची ९३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाली. धर्मविचार, कर्मविचार, पर्यावरण, साहित्य, संस्कृती या सर्वांची वाटचाल समृद्धीच्या मार्गाने व्हावी म्हणून धार्मिक भान राखून वावरणारे एक सात्विक व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले आहे.  त्यांच्या सामाजिक-सांस्कृतिक तत्त्वांना मूर्त रूप देणारी पिढी निश्चितच निर्माण होईल, याचा विश्वास वाटतो.

दिब्रिटो केवळ लिहिते साहित्यिक किंवा बोलके सुधारक नव्हते, तर त्यांनी वसईमध्ये पर्यावरण रक्षणासाठीही मोठी चळवळ उभी केली होती. मेणाहूनी मऊ असलेला हा ‘प्रभुदास’ वज्राहून कठीणसुद्धा कसा होऊ शकतो हे या चळवळीमध्ये अत्यंत लखलखीतपणे दिसून आले. - डॉ. सदानंद बोरसे, संपादक, राजहंस प्रकाशन.

अस्सल मराठी वाणाचे सुंदर लेखन करणारे सव्यसाची लेखक म्हणून फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची ओळख आहे. ज्या ज्या वेळी समाजात कसोटीचे प्रसंग येतात, त्या त्या वेळी विचारवंतांची खरी कसोटी लागते. अशा प्रत्येक प्रसंगी फादर यांनी अतिशय कणखर भूमिका घेत सुंदर लेखन केले. - मिलिंद जोशी, कार्याध्यक्ष, महाराष्ट्र साहित्य परिषद.

 माणसांना सांभाळून घेणे आणि त्यांच्याशी आदराने वागणे हा दिब्रिटो याचा स्थायीभाव होता. खूप मोठे व्यक्तिमत्व असूनही ते सर्वांना मुलांप्रमाणे वागणूक द्यायचे. माणसे जोडण्यात त्यांचा हातखंडा होता. त्यांचा नैतिकमूल्यांवर खूप भर होता. जात, भाषा, धर्म या पलीकडे जाऊन त्यांनी माणूस महत्त्वाचा मानला.- राजू नाईक (मुद्रा प्रकाशन)

फादर दिब्रिटो यांनी साहित्य, सामाजिक आणि पर्यावरण चळवळीत मोलाचे योगदान दिले आहे. भारतीय संस्कृती आणि संत साहित्याचा गाढा अभ्यास असलेल्या दिब्रिटो यांनी समाजात एकता, बंधुता, शांतता, सामाजिक सलोखा राहावा यासाठी व्याख्यानांच्या माध्यमातून समाजप्रबोधनाचे काम केले होते. त्यांचं व्यक्तिमत्त्व आणि कार्य प्रत्येकासाठी आदर्शवत असं होतं. - डॉ. हेमंत सवरा, खासदार 

वसई तालुक्यासाठी साहित्य क्षेत्रातील एक आदरणीय व्यक्तिमत्त्व म्हणून  फादर दिब्रिटो यांची ओळख होती. त्यांनी अनेक विषयांवर आंदोलने केली. संत साहित्याचे गाढे अभ्यासक असलेल्या फादर दिब्रिटो यांनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषवून वसईच्या साहित्य क्षेत्राला एक वेगळा आयाम दिला.- हितेंद्र ठाकूर, आमदार, वसई

फ्रान्सिस दिब्रिटो यांचे मराठी साहित्यावर खूप प्रेम होते. राजकारणातील गुंडगिरीविरोधात त्यांनी अनेक चळवळी उभ्या केल्या. चांगल्या लोकांच्या हातात राजकारण असावे, असे त्यांना नेहमी वाटायचे. पर्यावरण संरक्षणासाठी त्यांचे मोठे योगदान होते. धर्मगुरू म्हणून केलेल्या भ्रमंतीत समाजाची गरज ओळखून ती आपल्या साहित्यातून त्यांनी मांडली.    - प्रा. प्रदीप ढवळ, ज्येष्ठ साहित्यिक

निर्भीड साहित्यिक हरपला

फादर दिब्रिटो चे लेखन अतिशय नितळ आणि स्वच्छ होते. त्यांनी दिलेला वसईचा लढा कधीच विसरता येणार नाही. त्यांच्या लढ्यात मुंबईहूनही खूप लोक सहभागी झाले होते. त्यांचे साहित्य आणि पर्यावरणाशी खूप जवळचे नाते होते. यासाठी ते फार निष्ठेने काम करायचे. त्यांनी संपूर्ण ख्रिस्ती साहित्यातील तसेच ख्रिस्ती विचारांमधील उदारपणा उलगडून दाखवण्याचे फार मोठे काम केले आहे. - दिनकर गांगल (संस्थापक सदस्य,  ग्रंथाली, संस्थापक - व्हिजन महाराष्ट्र)

केवळ वसईसाठीच नव्हे, तर एकूणच मराठी साहित्य क्षेत्रात फादर दिब्रिटो यांचे मोठे योगदान होते. ते अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षही झालेले होते. ‘सुवार्ता’ मासिकाच्या माध्यमातून त्यांनी वसईत मोठी साहित्यिक चळवळ राबविली.  संत वाङ्मयाचा अभ्यास असलेले, ख्रिस्ती असूनही मराठी भाषेवर प्रभुत्व असलेला एक मान्यवर साहित्यिक आम्ही गमावला आहे.    - वीणा गवाणकर, लेखिका, वसई

फादर दिब्रिटो हे अत्यंत सिद्धहस्त लेखक होते. वसईचा निसर्ग वाचविण्यासाठी त्यांनी मोठी लोकचळवळ उभारत लढा दिला होता. त्यांनी वसईचे नाव जागतिक स्तरावर नेले. त्यांच्याकडे शब्दांचे सामर्थ्य असल्यामुळे त्यांनी पर्यावरणाचा लढा अधिक व्यापक केला. त्यांच्या लेखनात भारतीय संतांचे संदर्भ येत असत. त्यांच्या जाण्याने साहित्य विश्वाचे मोठे नुकसान झाले आहे.    - सिसिलिया कार्व्हालो, लेखिका, वसई

फादर दिब्रिटो यांच्या मनात प्रकाशन व्यवसायाबाबत खूप आस्था होती. प्रकाशन संस्थेतर्फे ज्या वेळी वसई-विरारमध्ये कार्यक्रम व्हायचे, तिथे वक्ता म्हणून ते यायचेच; पण श्रोते म्हणूनही यायचे. एखादे पद असेल तरच कार्यक्रमाला जायचे, असे काही त्यांच्या ठायी नव्हते. हेच त्यांचे मोठेपण होते. - सुदेश हिंगलासपूरकर (विश्वस्त, ग्रंथाली)

फादर दिब्रिटो हे कार्यकर्ता-लेखक कसा असावा याचे उत्तम उदाहरण होते. चुकीच्या असलेल्या गोष्टींच्या विरोधात ते सतत भांडत राहिले. मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांवर त्यांचे कमालीचे प्रभुत्व होते. ख्रिश्चन आणि भारतीय संस्कृतीचा सुरेख मिलाफ त्यांनी लेखनात घडवला. अतिशय निर्मळ, ऋजू तसेच सर्वांना सामावून घेणारा असा हा माणूस होता.     - नीरजा (कवयित्री)

सौजन्यमूर्ती या शब्दांत मी त्यांचे वर्णन करेन. हरित वसईसाठी त्यांनी कायम प्रयत्न केले. या भागातील सांस्कृतिक मराठी चळवळीचे ते अनभिषिक्त सम्राट होते. त्यांनी अनेक व्याख्यानमाला-संमेलने भरवलीच; पण तिथल्या लोकांसाठी कामेही केली. वसई हे मराठी सांस्कृतिक केंद्र बनण्याचे श्रेय त्यांनाच जाते. - संजय भास्कर जोशी (पुस्तक पेठ)

अतिशय सज्जन व्यक्तिमत्त्व, कोणत्याही कंपूमध्ये नसलेले ते साहित्यिक होते. पाठ्यपुस्तक मंडळावर असताना पाठ्यपुस्तके तयार करताना त्यांनी अनेक मूल्यांचा आग्रह धरला. ते कोणत्याही वादात नव्हते. ख्रिश्चन समाजाचे आधारस्तंभ असूनही साहित्यात कधीही त्यांनी जातीयवाद आणला नाही. - प्रा. अशोक बागवे, ज्येष्ठ कवी

फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या मुखातून बाहेर पडणारी अस्खलित मराठी मोहिनी घालायची, मनाला भिडायची. वसई परिसरात त्यांनी एक वेगळे स्थान निर्माण केले होते. खूप लोकांना सहकार्य केल्याने हा परिसर दिब्रिटोमयच झाला होता.    - अरविंद पाटकर (मनोविकास प्रकाशन)

खरा तो एकची धर्म, ही साने गुरुजींची प्रार्थना जगलेला हा माणूस. मानवता, बंधुता व न्यायासाठी सदैव जागृत कार्यकर्ता, लेखक, धर्मगुरू पासून हरित वसई, निर्भय बनो ते जन आंदोलन असा त्यांचा प्रवास संस्मरणीय राहील.     - डॉ. संजय मंगला गोपाळ, राष्ट्रीय समन्वयक, जनआंदोलन

अल्पपरिचय

- जन्म : ४-१२-१९४३ - शिक्षण : संत जोसेफ मराठी हायस्कूल, नंदाखाल, वसई (मराठी माध्यम-१९६२).- धर्मगुरूपदाचा दहा वर्षांचा अभ्यासक्रम- संत पायस कॉलेज, गोरेगाव, मुंबई.  (१९७२ ला धर्मगुरू म्हणून दीक्षा स्वीकार.)- बी. ए. (समाजशास्त्र) पुणे विद्यापीठ. - साहित्य आचार्य, महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे.- धर्मशास्त्रात एम.ए. (ग्रेरोरियन विद्यापीठ, रोम). 

सामाजिक कार्य 

- संपादक : सुवार्ता मासिक (१९८३ ते २००७) - संस्थापक : हरित वसई संरक्षण समिती (१९८८)

साहित्य संपदा 

- परिवर्तनासाठी धर्म (वैचारिक), तेजाची पाऊले, सृजनाची मोहर, सृजनाचा मळा (ललित), ओॲसिसच्या शोधात, संघर्षयात्रा ख्रिस्तभूमीची (प्रवासानुभव), ख्रिस्ताची गोष्ट, पोप दुसरे जॉन पॉल (चरित्र), मुलांचे बायबल (धार्मिक), ख्रिस्ती सण आणि उत्सव (सामाजिक), पर्वतावरील प्रवचन, तरंग (अध्यात्म), अनाहत ख्रिस्त.

- अनुवादित साहित्य : कृतघ्न (नाटक), पथिकाची नामयात्रा, आनंदाचे अंतरंग (अध्यात्म), मदर तेरेसा (चरित्र). 

- संपादित साहित्य : ही वाट स्वर्गाची, आशेचा उंबरठा ओलांडताना, सामर्थ्य आहे प्रार्थनेचे, येशूसह चाळीस दिवस (सर्व अध्यात्मिक) शृंगार, मैत्री आणि प्रीती (सामाजिक).

मिळालेले सन्मान

- ‘सुबोध बायबल : नवा करार’ पुस्तकासाठी साहित्य अकादमी राष्ट्रीय अनुवाद पुरस्कार (२०१३). 

- पुणे येथे झालेल्या १५ व्या मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद.

- प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती सन्मान.

- उस्मानाबाद येथे ९३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद.

- जळगावला भरलेल्या ११व्या राज्यस्तरीय सूर्योदय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद. 

टॅग्स :वसई विरार