मुंबई- कोकण मराठी साहित्य परिषद, युवाशक्ती पहिले राज्स्तरीय युवाशक्ती साहित्य संमेलन 8 आणि 9 डिसेंबर रोजी अंबरनाथ येथे होत आहे. या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी झी मराठी वरील चला हवा येऊ द्या या लोकप्रिय कार्यक्रमात पत्र लेखन करणाऱ्या प्रसिद्ध लेखक अरविंद जगताप यांच्या अध्यक्षतेखाली हे संमेलन होणार आहे संमेलनाचे स्वागताध्यक्ष अंबरनाथ चे माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी असून या संमेलनाची तयारीला जोरदार सुरुवात झाली आहेया संमेलनाविषयी माहिती देताना कोमसाप' युवाशक्तीच्या केंद्रीय अध्यक्षा प्रा. दीपा ठाणेकर यांनी प्रसिद्धी पत्रकात सांगितले की अंबरनाथच्या महात्मा गांधी विद्यालयाच्या सभागृहात ८ डिसेंबर रोजी सकाळी १० वा. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे या संमेलनाचे उदघाटन करतील. पद्मश्री मधू मंगेश कर्णिक, सहकार राज्यमंत्री नामदार गुलाबराव पाटील, नगराध्यक्ष मनीषा वाळेकर व उपनगराध्यक्ष अब्दुल शेख, बालाजी किणीकर , अरविंद वाळेकर हे मान्यवर उद्घाटन सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहतील, असे स्वागताध्यक्ष सुनील चौधरी यांनी सांगितले. 'कोमसाप'च्या अंबरनाथ शाखेने, केंद्रीय युवाशक्ती अध्यक्षप्रा. दीपा ठाणेकर आणि सल्लागार प्रा. प्रदीप ढवळ यांच्या मार्गदर्शनाखाली या संमेलनाचे आयोजन केले आहे. दोन दिवस चालणाऱ्या या राज्यस्तरीय युवाशक्ती साहित्य संमेलनात युवकांच्या आवडीच्या विषयांवर भरगच्च कार्यक्रम होतील. राजकारणातील युवा आवाज (परिसंवाद), युवा२२ ज सोशल मिडिया, ज्यांचा एकही संग्रह प्रकाशित नाही अशा दमदार कवी/ कावयित्रींशी आजचा कवितेवर चर्चा व त्यांचे काव्यवाचन, पु.ल.देशपांडे, गदिमा आणि अरविंद गोखले यांच्या जन्मशताब्दी निमित्त त्यांच्या साहित्याचे अभिवाचन, असे विविध कार्यक्रम सादर केले जाणार आहेत.संमेलनाध्यक्ष अरविंद जगताप यांच्याशी ८ डिसेंबर ला दु. ४.३० वा. पत्रकार राजेश दाभोळकर आणि केतन सरदेसाई अनवट गप्पा करतील. 'हवा येऊ द्या' मधील पोस्टमनची हृदयस्पर्शी पत्रे अरविंद जगताप यांनी लिहिलेली आहेत.. बाप रे बाप, अडगुलं मडगुलं, जय महाराष्ट्र ढाबा भटिंडा आदी चित्रपटांचे लेखक आणि गीतकार म्हणून प्रसिद्ध असलेल्या जगताप यांनी शेतकऱ्यांच्या आत्महत्या तसेच जनसामान्यांच्या अनेक प्रश्नांवर गंभीर लेखन केलेले आहे.युवापिढीला ध्येयवादी होण्यासाठी काय करता येईल याचे मार्गदर्शन करण्यासाठी ९ डिसेंबर रोजी दु. १२.३० वा. राज्याचे विशेष पोलीस महानिरीक्षक आयर्नमॅन श्री. कृष्णप्रकाश (कढर) तरुणांशी संवाद साधतील. या युवाशक्ती साहित्य संमेलनात किरण येले, हर्षदा सौरभ, अनिल साबळे, सुनीता रामचंद्र, प्रियांका तुपे , वैभव छाया, अमिता दरेकर, दिनेश केळुसकर, नामदेव कोळी, प्रशांत डिंगणकर, शर्मिष्ठा भोसले आजच्या घडीचे युवा कवी-लेखक या संमेलनात सहभागी होणार आहेत. या संमेलनापूर्वी युवकांची एकपात्री-द्विपात्री सादरीकरण स्पर्धाही १ डिसेंबर रोजी अंबरनाथ येथे आयोजिण्यात आलेली असून यशस्वी स्पर्धकांना ९ डिसेंबर रोजी आपली कला सादर करण्याची संधी मिळणार आहे.संमेलनाचा समारोप सोहळा ९ डिसेंबरला सायं ५ वाजता संपन्न होणार असून मा. मंत्रीमहोदय श्री. एकनाथ शिंदे यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे.मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर प्रमुख अतिथी म्हणून युवा साहित्यिकांशी व वाचकांशी संवाद साधतील. न्युज 18 चे समूह संपादक मा.उदय निरगुडकर , सचिव, महाराष्ट्र साहित्य आणि संस्कृती मंडळ मा.मीनाक्षी पाटील यांचीही उपस्थिती आणि मार्गदर्शन याप्रसंगी युवकांना लाभणार आहे.
कोमसाप युवाशक्तीचे पहिले राज्यस्तरीय युवाशक्ती साहित्य संमेलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2018 2:07 PM