मुंबईच्या सत्तेची लिटमस टेस्ट; शिवसेनेच्या कोणत्या गटाला मतदार कौल देणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2022 09:36 AM2022-10-04T09:36:45+5:302022-10-04T09:37:49+5:30
एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर होत असलेली ही पहिलीच विधानसभा पोटनिवडणूक असल्याने ठाकरेंच्या नेतृत्वातील शिवसेनेची सत्त्वपरीक्षा असेल.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई: मुंबईतील अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात ३ नोव्हेंबरला निवडणूक होणार असून या निमित्ताने उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेना विरुद्ध भाजप असा सरळ सामना रंगण्याची शक्यता आहे. निकाल ६ नोव्हेंबरला जाहीर होईल.
महाविकास आघाडीतील राष्ट्रवादीने शिवसेनेच्या उमेदवाराला या निवडणुकीत पाठिंबा राहील, असे जाहीर केले आहे. काँग्रेसने मात्र अद्याप भूमिका स्पष्ट केलेली नाही. २०१९ च्या निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकावर राहिलेले अपक्ष मुरजी पटेल यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. पटेल यांना एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचा पाठिंबा असेल. शिवसेनेच्या कोणत्या गटाला मतदार कौल देतात हेही या निमित्ताने दिसेल.
शिवसेनेने उमेदवार जाहीर केलेला नाही. शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांचे ११ मे २०२२ रोजी दुबईत हृदयविकाराने निधन झाले. सहानुभूतीचा विचार करता त्यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना शिवसेना उमेदवारी देईल, अशी शक्यता आहे. त्यावेळी शिवसेना-भाजप व काँग्रेस-राष्ट्रवादी युती होती. एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर होत असलेली ही पहिलीच विधानसभा पोटनिवडणूक असल्याने ठाकरेंच्या नेतृत्वातील शिवसेनेची या पोटनिवडणुकीच्या निमित्ताने सत्त्वपरीक्षा असेल. २०१९ नंतर तीन मतदारसंघांत पोटनिवडणूक झाली. त्यात भाजपला एक जागा अधिक मिळाली तर काॅंग्रेसने २ जागा कायम राखल्या.
देशात ६ विधानसभा मतदारसंघांमध्ये पोटनिवडणुका
नवी दिल्ली : देशातील सहा राज्यांमध्ये सात विधानसभा मतदारसंघांत येत्या ३ नोव्हेंबर रोजी पोटनिवडणुका होणार आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाने सांगितले की, बिहारमधील मोकामा, गोपालगंज, महाराष्ट्राची राजधानी मुंबईतील अंधेरी पूर्व, हरयाणातील आदमपूर, तेलंगणातील मुनुगोडे, उत्तर प्रदेशमधील गोला गोरखनाथ, ओडिशातील धामनगर या सात विधानसभा मतदारसंघांमध्ये ३ नोव्हेंबरला पोटनिवडणूक होणार आहे.
निवडणूक कार्यक्रम
अर्ज भरण्याची शेवटची तारीख : १४ ऑक्टोबर
अर्जांची छाननी : १५ ऑक्टोबर
अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख : १७ ऑक्टोबर
मतदान : ३ नोव्हेंबर
मतमोजणी व निकाल : ६ नोव्हेंबर
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"