कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी : छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर अनुयायांसाठी नागरी सेवासुविधा नाहीत
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : यंदा महापरिनिर्वाण दिनी छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे कोणत्याही प्रकारच्या नागरी सुविधा अनुयायांना उपलब्ध होणार नाहीत. मानवंदना कार्यक्रमाचे ऑनलाइन थेट प्रक्षेपण करण्यात येईल, जेणेकरून अनुयायांसह सर्वांना आपापल्या घरी राहून, स्थानिक स्तरावरून अभिवादन करता येईल. प्रत्यक्ष चैत्यभूमी येथे न येता, अनुयायांना अभिवादन करणे शक्य व्हावे म्हणून थेट प्रक्षेपणाची विशेष सोय करण्यात आली आहे.
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६ डिसेंबर, महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने दादर येथील चैत्यभूमी स्मारक येथे करण्यात येत असलेल्या पूर्वतयारीची अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी शुक्रवारी पाहणी केली. चैत्यभूमी येथे पुष्प सजावट, रंगरंगोटी, किरकोळ दुरुस्ती, दिवाबत्ती ही सर्व नियमित कामे सुरू आहेत.
- शासकीय मानवंदना, हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी
कोरोनाचा धोका पाहता तसेच दुसरी लाट येण्याची शक्यता लक्षात घेता प्रशासन सज्ज असून, महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमी येथे शासकीय मानवंदना देऊन हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी करण्यात येईल. कोरोना संसर्ग प्रतिबंधात्मक मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करता यावे, कोरोनाचा प्रसार होऊ नये म्हणून एकत्र येण्यावर निर्बंध आहेत.