तणावमुक्त जगा, संवाद साधा; जनजागृती, समुपदेशनाची गरज

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2019 01:21 AM2019-09-10T01:21:33+5:302019-09-10T01:22:13+5:30

मानसोपचारतज्ज्ञांचे मत : आत्महत्या करण्यापेक्षा लक्षणे ओळखून उपचार करा, नैराश्येला बळी पडू नका

Live stress free, communicate; Need for awareness, counseling | तणावमुक्त जगा, संवाद साधा; जनजागृती, समुपदेशनाची गरज

तणावमुक्त जगा, संवाद साधा; जनजागृती, समुपदेशनाची गरज

Next

मुंबई : धकाधकीचे जीवन, वाढती जीवघेणी स्पर्धा, कौटुंबिक कलह, नातेसंबंध या सगळ््यामुळे दिवसागणिक ताण-तणाव, नैराश्य वाढते आहे. नैराश्याला बळी जाऊन आत्महत्येचे टोक गाठले जाते. हेच टाळण्यासाठी जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिनाच्या पार्श्वभूमीवर तणावमुक्त जगा आणि आप्तेष्ट, कुटुंबांशी संवाद साधा,असा सल्ला मानसोपचारतज्ज्ञांनी दिला आहे.

तणाव, ताण हे रक्तदाबाप्रमाणेच सायलेंट किलर डिसिज असल्याचे मनोविकारतज्ज्ञ सांगतात. अनेकदा तर एखाद्या व्यक्तीला आपण तणावाचे शिकार बनलेले कळतही नाही. अशा स्थितीत परिस्थिती बिघडण्यापूर्वीच ताणाचे, तणावाची लक्षणे ओळखणे गरजेचे आहे, असा सल्ला मनोविकारतज्ज्ञ डॉ. नूतन लोहिया यांनी सांगितले. तणावाची अनेक कारणे असू शकतात. तणाव हा नैराश्यात रुपांतरित होऊन टोकाचे पाऊल गाठण्यासाठी प्रोत्साहित करतो़ अशा वेळेस सकारात्मकता बाळगली पाहिजे. संवाद कायम राखला पाहिजे, असेही डॉ. लोहिया यांनी सांगितले.

स्पर्धात्मक युगात प्रत्येकाला पुढे जायचे आहे. कोणाला सेलिब्रिटी व्हायचे तर कोणाला परदेशात स्थायिक व्हायचे आहे. लहानपणापासूनच सचिन तेंडुलकर होण्याचे संस्कार केले जातात. यातूनच जीवघेणी स्पर्धा वाढत चालली आहे. मुलांच्या परीक्षेत पालकही तणावाखाली वावरतात. अपयशाची अनामिक भीती मानगुटीवर असल्याने त्यातून मार्ग काढण्यासाठी नानाविध उपाय केले जातात. यामुळे ताण कमी होण्याऐवजी वाढतच असतो. एकीकडे नोकरी, उद्योगाचा ताण, तर दुसरीकडे पाल्याचे भवितव्य या कात्रीत सध्याची पिढी अडकली आहे. या ताणामुळे शरीरावर विपरित परिणाम होत असून त्याचे दुष्पपरिणाम पन्नाशी, साठीनंतर दिसू लागतात. आतापासूनच आपण काळजी घेतली तर आपण ताण-तणावाचे बळी ठरणार नाहीत, असे मनोविकारतज्ज्ञ डॉ. सुरेंद्र राजाध्यक्ष यांनी सांगितले.

पालक व मुले यांच्यातील संवाद हरपला आहे. मुलगा जर ताणतणावात असेल तर पालक हे समाजाच्या भीतीने त्याला मानसोपचार तज्ज्ञांकडे घेऊन जात नाही. मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घेणे म्हणजे तो वेडा आहे, असे अजिबात नाही. समाजाच्या भीतीपोटी लोक मुलांच्या आजाराकडे दुर्लक्ष करत आहे, त्यातूनच आत्महत्येचे प्रमाण वाढत आहे. - डॉ. दिलीप रोडे, मनोविकारतज्ज्ञ

ही आहेत आत्महत्येची प्रमुख कारणे

  • कौटुंबिक समस्या
  • जुनाट आजार, व्यसनाधीनता
  • प्रेमभंग अथवा एकतर्फी प्रेम
  • मानसिक आजार, नैराश्य
  • आर्थिक परिस्थिती, बेकारी, गरिबी
  • हुंडाबळी, कौटुंबिक वाद
  • समाजातील बदनामी

 

देशात दर ४० सेंकदांमागे एक आत्महत्या
नैराश्य, ताणतणाव, आजारपण, भीती, चिंता यांसारख्या मानसिक आरोग्याशी निगडित असलेल्या या गोष्टी आत्महत्येस कारणीभूत ठरत असून, जगभरात आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे. जगात दरवर्षी आठ लाख आत्महत्या होत आहेत. त्यात एक लाख लोकसंख्येमागे १६ लोक, तर प्रत्येक ४० सेकंदाला एक आत्महत्या होत असल्याचे दिसून येत आहे.

हे प्रमाण रोखण्यासाठी आत्महत्येसंदर्भात जनजागृती करण्याची गरज असल्याचे मत मानसोपचार तज्ज्ञांनी व्यक्त केले. देशात वेगवेगळ्या कारणांसाठी आत्महत्या होतात. यात सर्वाधिक आत्महत्या या कौटुंबिक समस्यांमुळे होत असल्याचे दिसून येते.

Web Title: Live stress free, communicate; Need for awareness, counseling

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.