पश्चिम उपनगरात अनेक ठिकाणी वर्ल्ड कप मॅचचे लाईव्ह प्रक्षेपण
By मनोहर कुंभेजकर | Published: November 19, 2023 06:45 PM2023-11-19T18:45:48+5:302023-11-19T18:45:56+5:30
यावेळी सोबत नाष्टा,चहा,कोल्ड्रिंक,डिजे आणि फटाक्यांची व्यवस्था देखिल होती.
मुंबई-आजची भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया वर्ल्ड कप फायनल मॅच याची देही याची डोळा बघण्यासाठी आणि मुंबईच्या क्रिकेट रसिक प्रेक्षकांसाठी ही मॅच लाईव्ह दाखवण्यासाठी पश्चिम उपनगरात विविध राजकीय पक्ष आणि सामाजिक संस्था,गृहनिर्माण संस्था यांनी आपल्या भागात अनेक ठिकाणी मोठे स्क्रीन लावत ही मॅच लाईव्ह दाखवली होती. यावेळी सोबत नाष्टा,चहा,कोल्ड्रिंक,डिजे आणि फटाक्यांची व्यवस्था देखिल होती.
आज दुपारी दीड पासून कांदिवली पश्चिम पोईसर जिमखाना येथे उत्तर मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी यांनी 20 x 12 फूट मोठ्या एलईडी स्क्रीनवर उद्याच्या क्रिकेट विश्व कप फाइनलचे लाईव्ह टेलिकास्ट केले होते.आपण नरेंद्र मोदी स्टेडियम वरची ही फायनल मॅच बघण्यासाठी येथील नागरिकांनी,तरुणांनी आपल्या परिवारासह गर्दी केली होती.उपस्थित क्रिकेट प्रेमी नागरिकांसाठी चहा,नाष्ट्याची व्यवस्था केली असल्याची माहिती पोईसर जिमखान्याचे उपाध्यक्ष करूणाकर शेट्टी यांनी दिली.
उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना -युवासेना अंधेरी पूर्व विधानसभेच्या वतीने युवासेना विधानसभा चिटणीस अमेय लटके यांनी या विधानसभा क्षेत्रात सहा ठिकाणी वर्ल्ड कपचे थेट लाईव्ह प्रक्षेपण केले होते. न्यु दिंडोशी आयटी पार्क जवळील न्यु म्हाडा इमारत क्रमांक 2 आणि 3 येथील गृहनिर्माण सोसायटीच्या नागरिकांसाठी श्री समर्थ युथ फॉउंडेशन च्या युवक मंडळ कडून नियोजन अध्यक्ष श्री सुनिल थळे आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी केले होते. सोसायटीच्या गार्डन मध्ये थेट लाईव्ह प्रक्षेपण करण्यासाठी मोठा स्क्रीन लावला होता.सोसायटीच्या नागरिकांसाठी वडा पाव,कोल्ड्रिंक्स आणि चहाची व्यवस्था होती.विशेष म्हणजे महिलांसह कुटुंबाने देखिल या मॅचचा मनमुराद आनंद लुटला.तर डीजे आणि फटाके देखिल आम्ही ठेवले असल्याचे थळे यांनी सांगितले.
भाजप जनता युवा मोर्चा मुंबई अध्यक्ष तेजिंदर सिंग तिवाना यांनी अभिमान आणि साई बाबा पार्क रेसिडंड असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने मालाड पश्चिम,एव्हरशाईन नगर,साई बाबा पार्क येथे 12 फूट बाय 8 फूटांचा मोठा स्क्रीन लावला होता.यावेळी येथील नागरिकांनी आणि तरुणांनी गर्दी करत,चहा,नाष्टाचा आस्वाद घेत या चुरशीच्या मॅचचा मनमुराद आनंद लुटला.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या अंधेरी पश्चिम विधानसभेच्या वतीने विभागातील क्रिकेटप्रेमींसाठी विश्व चषक अंतिम सामन्याचे थेट प्रक्षेपण बघण्यासाठी जे. व्ही. पी. डी ग्राउंड, जुहू येथे विधानसभा संघटक संजय कदम व विधानसभा समन्वयक सुनील जैन खंबिया यांनी २००० क्रिकेट रसिकांची विनामूल्य बैठक व्यवस्था केली होती.