Join us

'ही २ अक्षरं जगा, या ३ अक्षरांवर प्रेम करा'; गुढी पाडव्याच्या सेभेसाठी मनसेचा टीझर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2023 10:14 AM

राज ठाकरेंनी गेल्या काही दिवसांत बदललेली भूमिका राजकारणाच चर्चेचा विषय ठरली आहे.

मुंबई - राज्याच्या राजकारणाचा चिखल झालाय, अशी राजकीय परिस्थिती यापूर्वी महाराष्ट्राने कधीही पाहिली नाही, असे म्हणत मनसेप्रमुखराज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वीच नाराजी व्यक्त केली होती. तर, मनसेच्या १६ व्या वर्धापन दिनी कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना आपण सत्तेत येणार असल्याचा विश्वासही दिला. यावेळी, बोलताना राज ठाकरेंनी मी आज राजकीय काही बोलणार नाही, जे बोलायंचय ते गुढी पाडव्याच्या मेळाव्यात बोलेन, असेही स्पष्ट केले होते. त्यानुसार, आता मनसेच्या पाडवा मेळाव्याची तयारी सुरू झालीय. मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी याबाबतचा टीझर व्हिडिओही शेअर केलाय.

राज ठाकरेंनी गेल्या काही दिवसांत बदललेली भूमिका राजकारणाच चर्चेचा विषय ठरली आहे. हिंदुत्त्वाची शाल घेऊन राज ठाकरेंनी आता मराठीसह हिंदूंच्या भावनेला जपण्यासाठी पुढाकार घेतल्याचं दिसून येतंय. त्याअनुषंगानेच त्यांनी मशिदींवरील भोंग्यांविरुद्ध घेतलेलं आंदोलन चर्चेचा विषय ठरलं होतं. तर, राज्याच्या राजकारणात शिंदे गटाला त्यांचा पाठिंबा दिसून येत असून ते उद्धव ठाकरेंवर टीकेचे बाण चालवत आहेत. त्यामुळेच, राज ठाकरेंची राजकीय भूमिका काय असेल हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. राज ठाकरे मनसेच्या गुढी पाडवा मेळाव्यात राजकीय सत्ताधारी किंवा विरोधकांवर आपली भूमिका स्पष्ट करू शकतात. राज्यात सुरू असलेल्या राजकीय समिकरणांवर आणि राजकीय वातावरणावरही ते भाष्य करतील. तर, ते शिवसेनेच्या समर्थनार्थ उतरतील की विरोधात हेही समजून घेता येईल. त्यामुळे, सर्वांनाच राज ठाकरेंच्या भाषणाची आतुरता आहे. 

मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी ट्विटरवरुन गुढी पाडव्याच्या मेळाव्याची तयारी सुरू असल्याच्या अनुषंगाने एक व्हिडिओ जारी केला आहे. हिंदवीस्वराज्य, महाराष्ट्रधर्म आणि महाराष्ट्र सैनिक या हॅशटॅगने त्यांनी हा व्हिडिओ शेअर केलाय. या व्हिडिओत हिंदू ही २ अक्षरा जगा, मराठी या ३ अक्षरांवर प्रेम करा, महाराष्ट्र या ४ अक्षरांसाठी काम करा, राज ठाकरे ही ५ अक्षरं नेहमीच पाठिशी असतील, असा संदेश या व्हिडिओतून देण्यात आलंय. २२ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता शिवाजी पार्क मैदानावर ही सभा होणार आहे. 

टॅग्स :राज ठाकरेमनसेगुढीपाडवाशिवसेना