Sharad Pawar ED Visit: राष्ट्रवादी काँग्रेसचं शिष्टमंडळ ईडी अधिकाऱ्यांना भेटणार - सूत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2019 08:08 AM2019-09-27T08:08:00+5:302019-09-27T15:03:57+5:30

ED inquiry against Sharad Pawar

Live Updates, News, Article on Sharad Pawar to visit ED office Today, imposes section 144 in South Mumbai, NCP workers had staged protests | Sharad Pawar ED Visit: राष्ट्रवादी काँग्रेसचं शिष्टमंडळ ईडी अधिकाऱ्यांना भेटणार - सूत्र

Sharad Pawar ED Visit: राष्ट्रवादी काँग्रेसचं शिष्टमंडळ ईडी अधिकाऱ्यांना भेटणार - सूत्र

Next

राज्य मध्यवर्ती सहकारी शिखर बॅँकेच्या कथित कर्ज घोटाळ्यात संशयित आरोपी म्हणून नाव दाखल केल्यानंतर राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्वत:हून ईडी कार्यालयात हजर राहून आपल्यावरील आरोपाचा खुलासा करण्याची भूमिका घेतली आहे. या पार्श्वभूमीवर बॅलार्ड इस्टेट येथील ईडी कार्यालयाजवळ सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांनी १४४ कलमान्वये जमावबंदी लागू केली आहे.

 

01:43 PM

लोकांना त्रास होईल असं वागणार नाही; ईडी कार्यालयात जाण्याचा पवारांचा निर्णय स्थगित

कालच्या 24 तारखेला पत्रकार परिषद घेऊन मी सांगितलं होतं की, आज मी ईडी कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांना विनंती करणार आहे, शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. त्या बँकेत मी संचालक नव्हतो, सभासद नव्हतो असं असताना माझ्यावर गुन्हा दाखल केला. मी चौकशीत सहकार्य करण्यास तयार आहे. आचारसंहिता लागल्यानंतर मी राज्यभर निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त असणार आहे. त्यामुळे मी चौकशीपासून पळ काढतोय असं अर्थ निघू नये, जनमानसात प्रतिमा खराब करण्यासाठी असे आरोप करण्यात आले आहे. ईडीने कळविलं की तुम्ही याठिकाणी यायची गरज नाही, तूर्तास कोणतीही चौकशी नाही असं स्पष्ट केलं.  मुंबई पोलिसांनीही भेट दिली. महाराष्ट्रात संतापाची लाट आहे, त्याची प्रतिक्रिया शहरात, जिल्ह्यात दिसायला लागली आहे. मुंबईबाहेर लोकांना अडवलं जात आहे. या सर्व गोष्टीमुळे कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती बिघडू शकते. मी स्वत: गृह खातं सांभाळलं आहे. माझ्या कोणत्या कृतीमुळे लोकांना त्रास होईल असं मी वागणार नाही त्यामुळे मी ईडी कार्यालयात जाणार नाही असं शरद पवारांनी स्पष्ट केलं. कार्यकर्त्यांचे, आम्हाला साथ देणाऱ्या प्रादेशिक पक्षांचे आभार मानतो. 

 

01:30 PM

मुंबई पोलीस आयुक्त संजय बर्वेंनी घेतली शरद पवारांची भेट

01:00 PM

तूर्तास चौकशीची गरज नाही, ईडीने पाठवला शरद पवारांना ईमेल

ईडी कार्यालयाकडून शरद पवारांना ईमेल पाठविण्यात आला आहे. तुर्तास चौकशीची कोणतीही गरज नाही असं ईडीने स्पष्ट केलं आहे मात्र राष्ट्रवादी काँग्रेसने शरद पवार ईडी कार्यालयात जाणारच या भूमिकेवर ठाम राहिले आहे. 

12:36 PM

तपास यंत्रणांचा गैरवापर अशाप्रकारे कधीही झाला नव्हता - शिवसेना

11:54 AM

राष्ट्रवादी कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांची सरकारविरोधात निदर्शने

संविधानिक संस्थांचा राजकीय हत्यार म्हणून सत्ताधाऱ्यांकडून वापर होत आहे असा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सरकारविरोधात घोषणाबाजी केली. 

11:45 AM

ईडी अन् राष्ट्रवादी कार्यालयाबाहेर पोलिसांची ड्रोनद्वारे करडी नजर

11:30 AM

राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

11:19 AM

शरद पवारांवरील कारवाईविरोधात राहुल गांधी मैदानात, सरकारवर केली टीका

शरद पवारांच्या समर्थनार्थ राहुल गांधी यांनी ट्वीट करून सरकारने केलेल्या कारवाईचा निषेध केला आहे. निवडणुका तोंडावर असताना अशाप्रकारे विरोधकांवर कारवाई करण्याचं राजकारण सरकारकडून केलं जातंय असं त्यांनी म्हटलं आहे.

11:14 AM

हिंगोली-नांदेड रस्त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केला रास्ता रोको

शरद पवारांवरील ईडी कारवाईविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. अनेक ठिकाणी बंद आणि रस्ता रोको आंदोलन करण्यात येत आहे. 

10:50 AM

ड्रोनच्या माध्यमातून प्रत्येक बारीकसारिक हालचालीवर पोलिसांचे लक्ष

शरद पवार हे दुपारी दोनच्या सुमारास सक्तवसुली संचनालयाच्या (ईडी) कार्यालयात जाणार असल्याने पोलिसांनी परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. सुमारे 1 हजार 500 पोलीस या ठिकाणी तैनात ठेवण्यात आल्याने या भागाला पोलीस छावणीचे स्वरुप प्राप्त झाले आहे.पोलिसांनी ड्रोनच्या माध्यमातून प्रत्येक बारीकसारिक हालचालीवर लक्ष ठेवले आहे. ड्रोनच्या माध्यमातून येथील परिस्थितीचे चित्रिकरण करण्यात येत आहे.

10:49 AM

कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस सज्ज

शरद पवार ईडी कार्यालयात जाणार असल्याने सुरक्षेच्या दृष्टीकोनातून पोलिसांनी योग्य खबरदारी घेतली आहे. परिसरात कलम 144 लागू केलं आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी योग्य तो मनुष्यबळ पोेलिसांनी तैनात ठेवलं आहे अशी माहिती पोलीस उपायुक्त संग्रामसिंह निशानदार यांनी दिली आहे. 

10:20 AM

सहपोलीस आयुक्त विनय चौबे यांनी घेतली शरद पवारांची भेट

10:19 AM

पोलिसांकडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाची पाहणी

10:17 AM

ईडीचे तपास अधिकारी शरद पवारांना भेटणार नाहीत - सूत्र

कोणतीही नोटीस न पाठवता शरद पवार स्वत:हून ईडीच्या कार्यालयात हजर राहणार आहेत. शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी ईडीने पवारांवर गुन्हा दाखल केला आहे. मात्र शरद पवारांना ईडीचे तपास अधिकारी भेटणार नाहीत. त्यांना काही निवेदन द्यायचं असेल तर इतर अधिकारी भेटतील. आम्ही चौकशी सुरु केली नाही ज्यावेळेला गरज भासेल तेव्हा शरद पवारांना चौकशीसाठी बोलविले जाईल असं ईडीच्या अधिकाऱ्यांनी पत्रकारांना माहिती दिली आहे. 

10:13 AM

शरद पवारांनी घराबाहेर पडू नये; पोलिसांनी केली विनंती

शरद पवारांनी घराबाहेर पडू नये अशी विनंती पोलिसांनी केली आहे. काही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी शरद पवारांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली आहे. राष्ट्रवादीचे नेतेदेखील शरद पवारांच्या बंगल्यावर जमा झालेले आहेत. 

09:39 AM

राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलं कार्यकर्त्यांना शांततेचं आवाहन

09:14 AM

ईडी कार्यालयाबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त

शरद पवार ईडी कार्यालयात येणार या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांकडून परिसरात 144 कलम लागू करण्यात आला आहे. ईडी कार्यालयाबाहेर पोलिसांचा मोठा फौैजफाटा तैनात करण्यात आला आहे. 

09:05 AM

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची धरपकड; ही दडपशाही योग्य नाही - मलिक

शरद पवार ईडीच्या कार्यालयात येणार असल्यामुळे मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. मात्र रात्रीपासूनच कार्यकर्त्यांची धरपकड पोलिसांनी केली आहे. ही दडपशाही योग्य नाही अशी टीका पक्षाचे प्रवक्ते आणि मुंबई अध्यक्ष नवाब मलिक यांनी केली आहे. 

08:19 AM

ईडी कार्यालयाबाहेर पोलिसांचा बंदोबस्त, कलम 144 लागू

शरद पवार ईडीच्या कार्यालयात येणार असल्याने दक्षिण मुंबईत पोलिसांनी कलम 144 लागू केलं आहे.  ईडी कार्यालयाबाहेर मोठ्या प्रमाणात पोलिसांनी बंदोबस्त लावला आहे. कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती बिघडू नये यासाठी पोलिसांनी खबरदारी घेतली आहे. 

08:11 AM

ईडी परिसरात गर्दी करु नका; शरद पवारांचं कार्यकर्त्यांना आवाहन

Web Title: Live Updates, News, Article on Sharad Pawar to visit ED office Today, imposes section 144 in South Mumbai, NCP workers had staged protests

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.