Join us

अवयवदानामुळे मिळाले चौघा जणांना जीवनदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2018 2:46 AM

गोरेगाव येथील ५२ वर्षीय व्यक्तीने अवयवदान करून चौघांना जीवनदान दिले आहे. गुरुवारी दुपारी अंधेरी येथील खासगी रुग्णालयात ही शस्त्रक्रिया पार पडली

मुंबई : गोरेगाव येथील ५२ वर्षीय व्यक्तीने अवयवदान करून चौघांना जीवनदान दिले आहे. गुरुवारी दुपारी अंधेरी येथील खासगी रुग्णालयात ही शस्त्रक्रिया पार पडली. यात यकृत, दोन्ही मूत्रपिंडे आणि हृदय दान करण्यात आले. त्यामुळे पुन्हा एकदा अवयवदानाच्या मोठ्या जनजागृतीचा सकारात्मक परिणाम दिसून आला आहे.अंधेरीतील ५२ वर्षीय अक्षय (नाव बदललेले) यांना गेल्या काही दिवसांपासून तीव्र डोकेदुखीचा त्रास होत होता. त्यामुळे त्यांना ७ जानेवारी रोजी रुग्णालयात दाखल करून उपचार सुरू केले. मात्र, मेंदूत रक्तस्राव झाल्याने १७ जानेवारी रोजी डॉक्टरांकडून ब्रेनडेड घोषित करण्यात आले. त्यानंतर, डॉक्टर आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या साहाय्याने रुग्णांच्या कुटुंबीयांना अवयवदानासाठी तयार होण्याकरिता समुपदेशन करण्यात आले.अखेरीस रुग्णाच्या पत्नीने अवयवदान करण्याची परवानगी दिली. त्यानुसार, रुग्णाचे अवयवदान करण्यात आले. झेडटीसीसीच्या नियमावलीनुसार, यकृत आणि एक मूत्रपिंड अंधेरी येथील रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या रुग्णांना दान करण्यात आले, तर दुसरे मूत्रपिंड पेडर रोड येथील रुग्णालयात दान केले आहे. हृदय पुण्यातील एका खासगी क्लिनिकमध्ये पाठविण्यात आले.