Join us  

विहिरीत पडलेल्या बिबट्याला जीवदान

By admin | Published: October 24, 2015 11:08 PM

नानिवडेतील घटना : दाजीपूरच्या अभयारण्यात सोडले

वैभववाडी : नानिवडे-कुरणवाडी येथील सार्वजनिक विहिरीत पडलेल्या दोन वर्षांच्या बिबट्याला वनविभागाने जीवदान दिले. सुमारे २५ फूट खोल विहिरीत पिंजरा सोडून त्याला बाहेर काढले. त्यानंतर फोंडाघाट येथे वैद्यकीय तपासणी करून त्याला दाजीपूरच्या (जि. कोल्हापूर) अभयारण्यात सोडले. नानिवडे-कुरणवाडी येथील कोकाटे यांच्या घरासमोरील आच्छादन असलेल्या विहिरीत शुक्रवारी रात्री बिबट्या पडला. सकाळी पाणी भरण्यासाठी विहिरीवर गेलेल्या महिलांना तो दिसला. बिबट्याच्या गुरगुरण्याने महिला घाबरून गेल्या. त्या महिलांनी ही माहिती पोलीसपाटील प्रकाश खाडये यांना दिली. खाडये यांनी पोलिसांना माहिती दिली. तर सरपंच मधुसुदन नानिवडेकर यांनी वनविभागाशी संपर्क साधला. सकाळी नऊच्या सुमारास पोलीस निरीक्षक कैलास बर्वे, सहायक उपनिरीक्षक एम. व्ही. चौकेकर, हवालदार जे. आर. धुरी, एम. के. जाधव आदी घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर ९.३0 च्या सुमारास वैभववाडीचे वनपाल के. व्ही. सावंत, फोंड्याचे वनपाल नाना तावडे, वनरक्षक दत्तगुरू पिळणकर, सुभाष बडदे, शशिकांत साटम, श्रीकृष्ण परीट, सादिक पटेल नानिवडेत पोहोचले. सुरुवातीला दोरीने सोडलेल्या फळीवर बिबट्या तासभर स्थिरावला. त्यानंतर सव्वा दहाच्या सुमारास पिंजरा आणला. पिंजरा विहिरीत सोडताच फळीवर स्थिरावलेला बिबट्या पिंजऱ्यात घुसला. बिबट्याला कणकवलीचे पशुधन विकास अधिकारी डॉ. वेर्लेकर यांनी त्याची तपासणी केली. त्यानंतर त्याला दाजीपूरच्या अभयारण्यात सोडले. (प्रतिनिधी) बिबट्यांचा सुळसुळाट वैभववाडी तालुक्यात गेल्या तीन चार वर्षांत बिबट्यांची संख्या वाढली आहे. या बिबट्यांनी मांगवली, वेंगसर, हेत, उंबर्डे, कुसूर, नापणे, कुंभवडे, आदी भागांत गुरे व शेळ्या मारून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे. शिवाय अनेक ठिकाणी मनुष्यवस्तीत बिबट्याचा वावर वाढला आहे. त्यामुळे जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी वनविभागाने बिबट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी सातत्याने होत आहे; परंतु वनखाते त्याबाबत गांभीर्य दाखवित नसल्याने जनतेत नाराजी आहे.