मुंबई : गेल्या काही वर्षांत रुग्णांवर अवयव प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रिया यशस्वी होत आहेत. विशेष म्हणजे अवयव प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रिया या मोठ्या प्रमाणात खासगी रुग्णालयात केल्या जात असून, त्यासाठी लाखो रुपयांचा खर्च येतो. मात्र, सर्वसामान्य रुग्णांना या शस्त्रक्रिया करणे परवडावे म्हणून वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अखत्यारीतील मुंबईच्या जे जे, पुणे येथील ससून व नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात लिव्हर व किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत.
गेल्या काही वर्षांत अवयव निकामी झालेल्या रुग्णांत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यांची प्रतीक्षा यादी महिन्यागणिक वाढत आहे. एका वर्षाला मेंदूमृत व्यक्तीकडून अवयवदान होण्याची संख्या आणि अवयवाची गरज असणाऱ्या रुग्णांची संख्या यामध्ये मोठी तफावत आहे. ती दूर करण्यासाठी मेंदूमृत अवयवदान मोठ्या प्रमाणात होणे गरजेचे आहे. त्यासाठी सर्वच वैद्यकीय महाविद्यालयात अवयवदानाबाबत मोठी जनजागृती करण्यात येत आहे.
मार्च २०२५ ला रुग्णालयाचे उदघाटन सोमवारी वैद्यकीय शिक्षण मंत्री यांनी जे जे रुग्णालयाला भेट दिली. त्यांनी रुग्ण व्यवस्थेचा आढावा घेतला. तसेच शस्त्रक्रिया करण्यासाठी काही उपकरणे लागणार आहेत, त्याचा प्रस्ताव बनविण्याचे आदेश दिले. तसेच सुपरस्पेशालिटी रुग्णालयाचे बांधकाम ज्या ठिकणी सुरू आहे त्या ठिकणी भेट दिली. त्यावेळी त्यांना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी हे बांधकाम मार्च २०२५ पर्यंत पूर्ण होणार असल्याचे सांगितले.
अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी मोठा खर्च रुग्णांना करावा लागतो. तो आवाक्याबाहेरचा असतो. त्यामुळे सुरुवातीला दोन अवयवांच्या प्रत्यारोपण शस्त्रक्रिया सुरू करण्यात येणार असून, त्यासाठी वैद्यकीय शिक्षण विभागातील तीन रुग्णालयांची निवड करण्यात आली आहे. याप्रकरणी सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांची मंगळवारी बैठक होणार आहे. - हसन मुश्रीफ, मंत्री, वैद्यकीय शिक्षण विभाग