एकाच वेळी यकृत, मूत्रपिंडाचे प्रत्यारोपण; विलेपार्ले रुग्णालयात शस्त्रक्रिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2017 02:44 AM2017-08-20T02:44:51+5:302017-08-20T02:45:07+5:30
एकाच रुग्णावर एकाच वेळी यकृत व मूत्रपिंड या दोन्ही अवयवांच्या प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया विलेपार्ले येथील एका रुग्णालयात यशस्वीपणे करण्यात आली. अशाप्रकराची ही पहिलीच शस्त्रक्रिया असल्याचा दावा रुग्णालयाने केला आहे.
मुंबई : एकाच रुग्णावर एकाच वेळी यकृत व मूत्रपिंड या दोन्ही अवयवांच्या प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया विलेपार्ले येथील एका रुग्णालयात यशस्वीपणे करण्यात आली. अशाप्रकराची ही पहिलीच शस्त्रक्रिया असल्याचा दावा रुग्णालयाने केला आहे.
१४ आॅगस्ट २०१७ रोजी १९ वर्षीय प्रतिभा विजयचंद निषाद या तरुणीचा अपघातात झाला. अपघातानंतर प्रतिभाला जवळच असलेल्या रुग्णालयात आणण्यात आले असता, तिच्या डोक्याला व अन्य ठिकाणी जबर दुखापत झाल्याने तिला ब्रेन डेड घोषित करण्यात आले. तिच्या कुटुंबाने तिचे अवयवदान करण्याचा निर्णय घेतला.
त्यानुसार १५ आॅगस्ट रोजी विलेपार्ले येथील रुग्णालयात रमण राजेंद्रन या ५८ वर्षीय रुग्णावर डॉ. संजय सिंग नेगी यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणाºया चमूने यशस्वी शस्त्रक्रिया केली. प्रथम लिव्हर-किडनी ट्रान्स्प्लांट (एसकेएल) शस्त्रक्रिया प्रथम यकृत प्रत्यारोपणाने सुरूवात करण्यात आली. त्यानंतर सल्लागार मूत्रपिंड विकारतज्ज्ञ डॉ. अनुप पी. चौधरी आणि सल्लागार मूत्रपिंड विकारतज्ज्ञ आणि प्रत्यारोपणतज्ज्ञ डॉ. हरीश पाठक यांच्या मार्गदर्शनाखाली मूत्रपिंड विकार विभागाच्या चमूने यशस्वी मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रिया केली.
प्रकृतीत सुधारणा
एकाच वेळी यकृत आणि मूत्रपिंड या दोन्ही अवयवांचे प्रत्यारोपण करणे, ही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया असून केवळ कोणत्याही एकाच अवयवाच्या प्रत्यारोपण प्रक्रियेपेक्षा या प्रक्रियेत अधिक मेहनत व वेळ द्यावा लागतो. यापूर्वी रुग्णावर टीआयपीएसएस उपचार केल्याने ही शस्त्रक्रिया करणे अधिक आव्हानात्मक होते. शस्त्रक्रियेनंतर आता रुग्णाच्या तब्येतीत सुधारणा होत आहे. असे डॉ. नेगी यांनी सांगितले.