मोटार बाइक अ‍ॅम्ब्युलन्समुळे मुंबईत ३५७४ रुग्णांना जीवनदान

By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2018 02:36 AM2018-08-03T02:36:45+5:302018-08-03T02:37:04+5:30

मुंबईसह राज्यातील काही भागांत सुरू केलेल्या मोटार बाइक अ‍ॅम्ब्युलन्स सेवेला गुरुवारी २ आॅगस्टल् रोजी एक वर्ष पूर्ण झाले. या कालावधीत एकट्या मुंबईत ३५७४ रुग्णांना तातडीने वैद्यकीय सुविधा मिळाल्या.

 Lives of 3574 patients in Mumbai due to motor bike ambulance | मोटार बाइक अ‍ॅम्ब्युलन्समुळे मुंबईत ३५७४ रुग्णांना जीवनदान

मोटार बाइक अ‍ॅम्ब्युलन्समुळे मुंबईत ३५७४ रुग्णांना जीवनदान

googlenewsNext

मुंबई : मुंबईसह राज्यातील काही भागांत सुरू केलेल्या मोटार बाइक अ‍ॅम्ब्युलन्स सेवेला गुरुवारी २ आॅगस्टल् रोजी एक वर्ष पूर्ण झाले. या कालावधीत एकट्या मुंबईत ३५७४ रुग्णांना तातडीने वैद्यकीय सुविधा मिळाल्या. वर्षभरात मुंबईत वीस तर मेळघाट आणि पालघर येथे प्रत्येकी पाच अशा ३० बाइक अ‍ॅम्ब्युलन्स राज्यात रुग्णांना सेवा देत आहेत.
दाटीवाटीची लोकवस्ती आणि अरुंद रस्त्यांच्या समस्येवर मात करत रुग्णांना तातडीने रुग्णालयापर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने गेल्या वर्षी २ आॅगस्ट रोजी बाइक अ‍ॅम्ब्युलन्सची सुरुवात करण्यात आली. प्रायोगिक तत्त्वावर मुंबईत दहा बाइक देण्यात आल्या. या सेवेला सुरुवात करताच मुंबईतील रेल्वे स्टेशन आणि अरुंद गल्ली, रस्ते येथून वैद्यकीय मदतीसाठी कॉल येऊ लागले. ज्या भागात चार चाकी रुग्णवाहिका पोहोचण्यास अडचण निर्माण होते अशा ठिकाणी बाइक अ‍ॅम्ब्युलन्स सेवा उपयुक्त असल्याचे दिसून येत आहे. या बाइक अ‍ॅम्ब्युलन्सचे चालक डॉक्टर असल्याने आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना प्रथमोपचारही देणे शक्य झाले आहे. वर्षभराच्या कालावधीत विविध वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत २७०० रुग्णांना उपचार देण्यात आले. तर अपघाताच्या ३९० रुग्णांना वेळीच वैद्यकीय मदत देण्यात आली. ४२ गरोदर मातांवर तत्काळ उपचार करण्यात आले तर अन्य ४४२ रुग्णांवर वेळेवर उपचार झाल्याने वर्षभरात ३५७४ रुग्णांना जीवनदान मिळाले.
मुंबईसह राज्यात सध्या तीस बाइक अ‍ॅम्ब्युलन्स आहेत. मेळघाट आणि पालघर अशा दुर्गम भागातही प्रत्येकी पाच अ‍ॅम्ब्युलन्स आहेत. अमरावतीत बैरागड, हरीसाल, हातरू, काटकुंभ, टेंभ्रु सोंडा या प्राथमिक आरोग्य केंद्रांत अ‍ॅम्ब्युलन्सची सुविधा आहे. पालघरमध्ये गंजाड, मालवाडा, मासवन, नंदगाव, तलवाडा या प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये ही सेवा सुरू केली आहे. मुंबईतील वांद्रे पूर्व, मालाड पूर्व, विलेपार्ले पश्चिम, जोगेश्वरी पूर्व, कांदिवली पश्चिम, बोरीवली पूर्व, अंधेरी पश्चिम, प्रभादेवी जी दक्षिण वॉर्ड, मरिन लाइन्स सी वॉर्ड, माहीम पश्चिम, वांद्रे पश्चिम, विक्रोळी पूर्व, सांताक्रुझ पूर्व, कुर्ला पश्चिम, धारावी पोलीस स्टेशन, गोवंडी पश्चिम आणि भांडुप पश्चिम या ठिकाणी बाइक अ‍ॅम्ब्युलन्स सेवा सुरू आहे.

Web Title:  Lives of 3574 patients in Mumbai due to motor bike ambulance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई