Join us

१२ ठिकाणी लोकांनी दिले खवले मांजराला जीवदान

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2020 5:49 AM

खवले मांजराला वाघाइतके संरक्षण; ४ वर्षांपासून सुरू आहे संरक्षण प्रकल्प

सचिन लुंगसे

मुंबई : अनेक ठिकाणी छापेमारीत पकडलेले खवले मांजरे व त्याचे खवले कोकणातून आल्याचे आढळत असल्याचे सह्याद्री निसर्ग मित्र संस्थेचे म्हणणे आहे. कोकणातील खवले मांजरांच्या संवर्धनासाठी संस्था सरसावली आहे. गेल्या ४ वर्षांपासून संस्थेतर्फे कोकणात खवले मांजर संरक्षण संवर्धन प्रकल्प राबविला जात आहे. वनविभागाचा मोलाचा सहभाग व मार्गदर्शन या कामाला लाभत असून, रत्नागिरी जिल्ह्यातील १२ ठिकाणी लोकांनी खवले मांजर वाचविण्यासाठी वनविभागाच्या वतीने प्रयत्न करीत त्याला जीवदान दिले.

जगात खवले मांजराच्या ८ प्रजाती आढळतात; त्यातील ४ प्रजाती आफ्रिकेत तर ४ आशिया खंडात आढळतात. यावर खवले मांजर संरक्षण संवर्धन प्रकल्पाबाबत अधिक माहिती देताना भाऊ काटदरे यांनी सांगितले की, जनजागृती, प्रत्यक्ष खवले मांजराचा अभ्यास, संशोधन व प्रत्यक्ष संरक्षण असे काम सुरू आहे. वनविभागाचे मार्गदर्शन या कामाला लाभत आहे. जागतिक पातळीवर खवले मांजराची शिकार होते आहे. त्याच्या खवल्यांना आंतराष्ट्रीय पातळीवर प्रचंड मागणी आहे. मुख्यत: चिनी औषधात ते वापरले जाते. त्यामुळे आंतरराष्ट्रीय टोळ्या या बेकायदेशीर कृत्यात सहभागी आहेत. कोकणसुद्धा त्याला अपवाद नाही. प्रकल्पांतर्गत चिपळूण तालुक्यातील १६४ गावांचे सर्वेक्षण करण्यात आले. ५ ते ६ लोकांना भेटून खवले मांजराची माहिती गोळा करण्यात आली. ८०३ लोकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. गुहागर, दापोली, संगमेश्वर, खेड तालुक्यांमधील गावांमध्ये सर्व्हे करण्यात आला. रत्नागिरी जिल्ह्यात सर्व्हे सुरू आहे.खवले मांजराला वाघाइतके संरक्षण

माणूस त्यांच्या बिळांचा शोध घेऊन, ती बिळे खणून त्यातून खवले मांजर काढून, त्याला उकळत्या पाण्यात घालून मारतात. यूआयसीएनच्या रेड डाटा बुकप्रमाणे भारतीय खवले मांजर धोक्यात असलेला प्राणी आहे. भारतीय वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ अन्वये खवले मांजराला शेड्यूल वनमध्ये समाविष्ट करण्यात आले. त्यामुळे त्याला वाघाइतके संरक्षण आहे.भारतात चिनी खवले मांजर व भारतीय खवले मांजर या दोन प्रजाती आढळतात.पूर्वोत्तर व हिमालय वगळता सर्वत्र भारतीय खवले मांजर आढळते.

भारतीय खवले मांजर सर्व प्रकारच्या अधिवासामध्ये आढळते.सुमारे पाच फूट लांब संपूर्ण शरीरावर खवले असलेल्या या प्राण्याला दात नसतात.एक फूट लांबीच्या चिकट जिभेच्या साहाय्याने तो हजारो वाळवी, मुंग्या खातो.

धोका वाटताच अंगाचे वेटोळे करतो, ते कोणालाही सोडविता येत नाही.खवले मजबूत असतात. त्यामुळे त्याला निसर्गात फार कमी शत्रू असतात. 

टॅग्स :पर्यावरणमुंबईवाघ